शिवसेनेचा सावधपवित्रा, श्रीनिवास वणगा अज्ञातस्थळी?
ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे उमेदवार रमेशआप्पा कराड यांना, ऐनवेळी उमेदवारीची माघार घ्यायला लावली, तशी .
मुंबई : भाजपचे दिवंगत नेते चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेची पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी दिली जाणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे बीड-उस्मानाबाद विधान परिषद निवडणुकीत भाजपाने राजकीय खेळी करत, ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे उमेदवार रमेशआप्पा कराड यांना, ऐनवेळी उमेदवारीची माघार घ्यायला लावली, तशी माघार श्रीनिवास वनगा यांनी घेऊ नये, किंवा उमेदवारी भरण्याआधी श्रीनिवास वनगा यांना भाजपने मन वळवून काही खेळी करू नये, म्हणून शिवसेनेने सावध पवित्रा घेत, श्रीनिवास वनगा यांना अज्ञात स्थळी हलवलं असल्याचं वृत्त काही वेबसाईटने दिलं आहे. शिवसेनेकडून मात्र याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
कारण बीड-उस्मानाबाद विधान परिषद निवडणुकीचे राष्ट्रवादीचे उमेदवार रमेशआप्पा कराड, हे आधी भाजपात होते, यानंतर त्यांचं मन वळवलं आणि त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी ऐन वेळेस सोडून दिली, उमेदवारीची माघार घेतली, असंच पालघर पोटनिवडणुकीच्या बाबतीत होऊ नये, म्हणून शिवसेनेने विशेष काळजी घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे.
कारण श्रीनिवास वनगा यांचे वडील देखील भाजपाचे निष्ठावंत नेते होते, त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता नाकारता येत नसल्याने, शिवसेनेने ही काळजी घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे. आता अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत श्रीनिवास वणगा यांना शिवसेनेला सांभाळून घ्यावं लागणार आहे, कारण बीडमध्ये रमेश कराड यांनी काही मिनिटे बाकी असताना, शेवटच्या क्षणी यूटर्न घेतला होता.
पालघर लोकसभेची पोटनिवडणूक २८ मे रोजी होणार आहे, या निवडणुकीसाठी आतापर्यंत १८ उमेदवारांनी अर्ज घेतला आहे. पालघर आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे, तर मतमोजणी 31 मे रोजी पार पडणार आहे. गोंदियाची जागा भाजपाचे नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने खाली झाली होती. नाना पटोले आता काँग्रेसमध्ये आहेत.