मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य ती काळजी घ्या, अशा सूचना वारंवार देऊनही नागरिकांकडून त्याचे पालन होताना दिसत नाही. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली रेल्वे स्थानकात गुरुवारी याचा प्रत्यय आला. सिंगापूरमधून परतल्यामुळे होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या सहा प्रवाशांना आज ताब्यात घेण्यात आले. हे सर्वजण मुंबई सेंट्रलहून सुटणाऱ्या सौराष्ट्र एक्स्प्रेसने प्रवास करत होते. सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकातून सुटली. मात्र, यामध्ये कोरोनाचे संशयित रुग्ण असल्याची माहिती मिळाल्यानंतर सौराष्ट्र एक्स्प्रेस बोरिवली स्थानकात थांबवण्यात आली. यानंतर या सर्व प्रवाशांना गाडीतून खाली उतरवण्यात आले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे नागरिक अजूनही कोरोनासारखी घातक समस्या गांभीर्याने घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कालच मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये होम क्वारंटाईन करण्यात आलेले चार जण आढळून आले होते. तिकीट तपासनीसाला यांच्या हातावरचा होम क्वारंटाईनचा शिक्का दिसल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर या चौघांना पालघर रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले होते. 


'कोरोनाविरुद्ध युद्ध सुरु झालंय, धोक्याचा भोंगा वाजलाय, आता सावध व्हा'


राज्यात गुरुवारी कोरोनाचे आणखी रुग्ण आढळून आले. यामध्ये मुंबई, उल्हासनगर आणि नगरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. नगरमधील रुग्ण ३ मार्चला तीन मार्चला दुबईहून परतला होता. तर मुंबईतील २२ वर्षीय तरुणी ही ब्रिटनहून आली होती. उल्हासनगरमधील ४९ वर्षीय महिला दुबईहून आली होती. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४९ पर्यंत पोहोचली आहे.