मुंबई : 'टेस्ट ट्युब बेबी' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जन्म झालेल्या एका बाळाच्या 'सिंगल पॅरेन्ट' असलेल्या आईला या बाळाचा जन्माचा दाखला मिळवण्यासाठी कोर्टात धाव घ्यावी लागलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नालासोपारा इथं राहणाऱ्या एका ३१ वर्षीय महिलेनं आपल्या बाळाला त्याच्या वडिलांच्या (स्पर्म डोनर) नावाशिवाय महानगरपालिकेकडून जन्माचा दाखला मिळवा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय.


काय आहे प्रकरण?


आपली मुलगी ही एक टेस्ट ट्युब बेबी आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून तिच्या जन्मासाठी स्पर्म घेण्यात आले... तिची आई ही 'सिंगल मदर' आहे आणि ती आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे. परंतु आपल्या बाळाचा जन्माचा दाखला घेण्यासाठी मुंबई महानगरपालिका या बाळाच्या 'स्पर्म डोनर'चं नाव जाहीर करण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही, असं या महिलेचं म्हणणं आहे.


कोर्टानं दिले आदेश


तिच्यावतीनं वकील उदय वारुंजीकर यांनी न्या. अभय ओका आणि न्या. प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठासमोर बाजू मांडली. सुप्रीम कोर्टाच्या २०१५ साली दिलेल्या एका आदेशानुसार, जर सिंगल पॅरेन्ट किंवा अविवाहीत आईनं आपल्या बाळाचा जन्माचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज केला असेल तर अधिकारी त्यांच्याकडून एक प्रतिज्ञापत्र घेऊन त्यावर पुढची प्रक्रिया करू शकतात. हा निर्णय मुंबई महानगरपालिकेलाही लागू होतो, असंही या महिलेचं म्हणणं आहे. 


या महिलेचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं मुंबई महानगरपालिकेला यावर उत्तर देण्याचे आदेश दिलेत. सोबतच मार्चमध्ये होणाऱ्या पुढच्या सुनावणीवेळी महापालिकेनं जन्मनोंदणी रजिस्टर सादर करण्याचे आदेशही कोर्टानं दिलेत.