सायन हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णाचा खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न
नुकताच सायन रुग्णालयातील एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
मुंबई: कोरोना रुग्णांच्या प्रचंड संख्येमुळे प्रशासकीय व्यवस्था कोलमडून पडलेल्या सायन रुग्णालयातून कोरोनाच्या एका रुग्णाने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी ३ मे रोजी ही घटना घडली होती. त्यादिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास या रुग्णाने वॉर्ड नंबर ५ मधील खिडकीतून बाहेर उडी मारली. मात्र, पीपीई किट घालून तयार असलेल्या पालिकेच्या सुरक्षारक्षकाने त्याला बघितले. यानंतर या सुरक्षारक्षकाने पोलिसांच्या मदतीने त्याला पकडून पुन्हा रुग्णालयात आणले.
कोरोना मृतदेहाच्या व्हायरल व्हिडिओबाबत हॉस्पिटलचे हे स्पष्टीकरण
या रुग्णाने पळून जायचा प्रयत्न का केला, याचे नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र, नुकताच सायन रुग्णालयातील एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हीडिओत कोरोना रुग्णांच्या वॉर्डमधील धक्कादायक चित्र दिसून आले होते. या वॉर्डमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवल्याचे दिसत आहे. बाजूच्या खाटांवर मृतदेह असताना इतर रुग्णांवर उपचार सुरु होते. काही रुग्णांचे नातेवाईकही वॉर्डमध्ये ये-जा करत होते. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
मुंबई कोरोनाच्या विळख्यात; आयसोलेशन छावण्यांची युद्धपातळीवर उभारणी
हा व्हीडिओ प्रसारित झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, अनेकदा रुग्णाचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास उपलब्ध नसतात किंवा फोन केल्यास रुग्णालयात येण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे मृतदेह वॉर्डमधूनल हलवण्यात विलंब होतो, असे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.