मुंबई : मुंबईतल्या सायन रुग्णालयाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. रुग्णाच्या किडनीमधला भलामोठा ट्यूमर यशस्वी शस्त्रक्रिया करुन, सायन रुग्णालयातल्या डॉक्टरांनी बाहेर काढला होता. जगातला सर्वात मोठा ठरलेला तब्बल साडेपाच किलो वजनाचा हा ट्यूमर होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायन रुग्णालयातल्या युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर अजित सावंत यांच्या नेतृत्वाखाली नोव्हेंबर 2016 मध्ये ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. बिहारमधली २८ वर्षांची महिला ३ वर्ष हा ट्यूमर घेऊन उपचारासाठी फिरत होती.


या महिलेच्या 125 ग्रॅमच्या किडनीतून तब्बल साडे पाच किलो वजनाचा ट्यूमर काढण्याचं धाडस करायला, कुठलाच डॉक्टर धजावत नव्हता. मात्र सायन रुग्णालयातल्या युरोलॉजी विभागाचे डॉक्टर अजित सावंत आणि त्यांच्या पथकानं हे आव्हान स्वीकारलं. तिच्यावर सलग सात तास शस्त्रक्रिया सुरु होती. अखेर जगातील सर्वात मोठा असा किडनीतला ट्यूमर बाहेर काढला गेला.


यासाठी शंभर टाके घालण्यात आले. जगात वैद्यकीय क्षेत्रात असं पहिल्यांदाच घडलं असल्यानं, डॉक्टर अजित सावंत आणि त्यांच्या पथकाच्या या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने तसा ई मेल सायन रुग्णालयाला पाठवला आहे. विशेष म्हणजे एका पालिका रुग्णालयानं मिळवलेलं हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे.