कृष्णात पाटील, मुंबई : किडनीचा आजार झालेल्या रुग्णांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. मुंबईत आता पहिल्यांदाच रात्रीची डायलिसीस सेवा सुरू करण्यात आली आहे. याचा फायदा अर्थातच रुग्णांना होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिरगावच्या एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातलं डायलिसिस सेंटर सध्या २४ तास सुरु असतं. मुंबईत पहिल्यांदाच इथं रात्रीदेखील रुग्णांवर डायलिसिस केलं जातंय. परदेशात अशा प्रकारे रात्रीचं नॉक्टर्नल डायलिसिस केलं जाते. त्याचे चांगले परिणाम रुग्णांमध्ये दिसू लागल्यानं आता मुंबईतही अशा प्रकारचं डायलिसिस सुरु करण्यात आलं आहे.


भारतात किडनी फेल झालेल्या रुग्णावर गरजेपेक्षा कमी डायलिसिस केलं जातं. साधारणत: आठवड्यातून तीन वेळा प्रत्येकी ४ तासांचं डायलिसिस होतं. तर नॉक्टर्नल डायलिसिसमध्ये आठवड्यातून तीन वेळा प्रत्येकी ८ तासांचं डायलिसिस केलं जातं. नॉक्टर्नल डायलिसिसमध्ये रुग्णांना कोणतंही पथ्य पाळण्याची गरज नसते. रात्री डायलिसीस होत असल्यानं रुग्णांना कामासाठी पूर्ण दिवस मिळतो.
दररोज घ्याव्या लागणाऱ्या औषधांचं प्रमाण थेट निम्म्यापेक्षा कमी होतं. म्हणजे जर रोज २०-३० गोळ्या घ्याव्या लागत असतील तर त्यांची संख्या ५-६ वर येते.
या डायलिसिसमुळं ह्रदयाची कार्यक्षमता वाढते, रक्तदाबही नियंत्रणात राहतो. त्यामुळं रुग्णांचं आयुर्मान वाढण्यास मदत होते.
  
रात्री डायलिसिसला जायचं, रात्रभर झोपायचं आणि सकाळी उठून परत यायचं, अशी ही पद्धत असणार आहे. रात्रीच्या वेळी डायलिसिस सेंटर सुरू ठेवल्यानं दिवसातला रुग्णांचा भारही कमी होणार आहे.


गरजेपेक्षा कमी डायलिसिस केल्यानं त्याचं दुष्परिणाम रुग्णांना झेलावे लागतात. त्यामुळं अधिकाधिक डायलिसिस हे आरोग्यासाठी चांगलं असतं, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यासाठी नॉक्टर्नल म्हणजे रात्रीचं डायलिसिसचा प्रसार होणं आवश्यक आहे.