मुंबई : सध्याचा काळ वर्क फ्रॉम होमचा आहे. पण त्यामुळे कामाचे तास वाढलेत. शिवाय तासन-तास एकाच जागी बसून काम करावं लागतंय. ही बाब तुमच्या जीवावर बेतू शकते. याबाबत WHOनं धोक्याचा इशाराही दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे बरेच जण घरातून काम करतायेत. तर कर्मचारी कपातीमुळे ऑफिसमधून काम करणाऱ्यांची संख्या घटलीय. त्यामुळे कामाचे तास वाढलेत. पण तासनतास काम करणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. अतिकाम केल्यानं ह्रदयविकाराचा धोका वाढल्याचा इशारा WHOअर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय.


WHO आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायजेशनच्या अभ्यासानुसार 2016 पर्यंत कामाच्या ताणामुळे ह्रदयविकारानं तब्बल 7 लाख 45 हजार लोकांचा
मृत्यू झाला. आता याच मृत्यूचं प्रमाण 29 टक्क्यांनी वाढलंय. कोरोनामुळे बहुतांश लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. घरातून काम करत असल्यानं त्यांचा स्क्रिन टाईम वाढलाय. 45 ते 74 वर्ष वयोगटातील लोक आठवड्याभरात 55 तासांहून अधिक तास काम करत आहेत. अशा लोकांच्या मृत्यूचं प्रमाण 72 टक्के आहे. 


तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार ह्रदयविकाराचा त्रास होण्याची अनेक कारणं आहेत. पण काम करणाऱ्या लोकांमध्ये, कामाचा ताण, नोकरीबाबतची अनिश्चितता, वेळी-अवेळी जेवण, जंकफूडचं अतिरेकी सेवन, अपुरी झोप आणि मद्यपान ही प्रमुख कारणं दिसून येत आहेत.


त्यामुळे निरोगी आयुष्य जगायचं असेल तर एकाच जागी तासनतास बसून काम करणं टाळा. पौष्टिक आहारासोबत व्यायामाकडे लक्ष द्या...कारण कुणीतरी म्हंटलंच आहे, सर सलामत तो पगडी पचास.