मुंबई : गेल्या स्मृतीदिनाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचं शिवतिर्थावरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर मनोमिलन झालं होतं. ती दृष्य आजही अनेकांना आठवतात. मात्र यंदा हे चित्र वेगळं होतं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा शिवतिर्थावर आले तेव्हा शिवसेनेचा कोणताच मोठा नेता त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षानंतर देवेंद्र फडणवीस हे शिवाजी पार्कवर येतील का अशी चर्चा सुरु असतानाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शिवतीर्थावर जाऊन अभिवादन केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप-सेनेमधील वादाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांच्या शिवतीर्थावरील भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान फडणवीस अभिवादन करत असताना शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सरकार कोणाची शिवसेनेची अशा घोषणा शिवसैनिकांनी यावेळी दिल्या. देवेंद्र फडणवीस हे देखील अभिवादन करुन लगेचच तेथून निघून गेले.



सध्या शिवसेना-भाजपमधील चर्चा पूर्णपणे बंद आहे. दोघांना ही एकमेकांसोबत चर्चा करायची नाही. कारण दोघेही मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे. शिवेसेनेचे नेते भाजपच्या नेत्यांपासून अंतर ठेवत आहेत. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस येण्याआधी उपस्थित असलेले अनेक शिवसेना नेते नंतर दिसले नाहीत.