मुंबई: अमोघ वक्तृत्वशैलीचे वरदान लाभलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचे मुंबई शहराशी खास नाते राहिले आहे. शिवाजी पार्क येथील त्यांची भाषणे किंवा कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद आजही अनेक भाजप नेत्यांच्या स्मरणात आहे. 
 
 मुंबईत आल्यानंतर वाजपेयी वेदप्रकाश गोयल यांच्या सायन येथील घरी उतरत. त्यावेळी वेदप्रकाश यांचे चिरंजीव व सध्याचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल वाजपेयींच्या भेटीगाठी आणि पत्रकार परिषदाचे वेळापत्रक सांभाळत. 
 
 राजकीय कारकीर्दीच्या शिखरावर असताना २४ डिसेंबर १९८४ रोजी वाजपेयी मुंबईत आले होते. यावेळी त्यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त शिवाजी पार्क येथे खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
 
 या कार्यक्रमापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा काँग्रेसला मिळाला. परिणामी भाजपचे केवळ दोनच खासदार निवडून आले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर वाजपेयी काय बोलणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. तत्पूर्वी भाजपच्या नेत्यांनी आपल्या भाषणांमध्ये अटलजींची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. अटलजी भाषणाला उभे राहिले तेव्हा त्यांनी साधारण १० सेकंदांचा पॉझ घेतला. त्यानंतर अटलजींनी म्हटले की, पराभूत झालेला अटल बिहारी वाजपेयी पाहण्यासाठी इतकी गर्दी. त्यांच्या या वाक्यावर साहजिकच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर वाजपेयींनी उपस्थित जनसमुदायाला विचारले की, तुम्ही सर्वजण मतदानाच्या दिवशी कुठे होता?. अशाप्रकारे वाजपेयींनी आपल्या वक्तृत्त्वाने ती सभा जिंकली. 
 
 योगायोगाने ११ वर्षांनी याच शिवाजी पार्कातील सभेत लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून अटल बिहारी वाजपेयींच्या नावाची घोषणा केली. त्याच्या काही दिवसांनीच वाजेपयी पंतप्रधानपदी विराजमान झाले. याशिवाय, २००९ मध्ये शिवतीर्थावरुनच वाजपेयींनी पक्षाची सूत्रे लालकृष्ण अडवाणी यांच्या हाती सोपविली होती. 
 
 याशिवाय, भाजपचे अनेक कार्यकर्ते वाजपेयींच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील आठवणींना उजाळा देताना दिसतात. प्रबोधिनीतर्फे अटलजींची भाषणे, कविता आणि लेखांचा समावेश असलेली एक पुस्तिका तयार करण्यात आली होती. ही पुस्तिका दाखवण्यासाठी काहीजण दिल्लीत गेले होते. 'राज-नीती से परे' असे या पुस्तिकेचे नाव होते. त्यावेळी वाजपेयींनी, 'तुम्ही मला अगोदरच राजकारणाबाहेर पाठवलेच आहे तर' अशी शाब्दिक कोटी केली होती.