मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालांतर महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या भाजपसोबत शिवसेनेच्या युतीत आलेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे सत्तास्थापनेच्या या गणितात राष्ट्रवादीचाही प्रवेश झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भूमिकेवरही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी राजकीय नेतेमंडळींची वर्दळ वाढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, रामराजे निंबाळकर यांनी बुधवारी सकाळतच्या सुमारास शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी रामराजे निंबाळकर यांनी भेटीचं कारण सांगण्यास मात्र नकार दिला. साखर कारखान्याच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं सांगत त्यांनी सत्तास्थापनेशी निगडीत प्रश्नांचं उत्तर देणं टाळलं. 



दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शरद पवार यांच्यातील जवळीक चांगलीच वाढल्याचे दिसत आहे. शरद पवार देशातील मोठे नेते आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलत असू तर तो अपराध ठरतो काय? त्यांना सगळ्यांनी भेटावं. सध्या शरद पवार यांच्याशी कोण कोण बोलत आहे, या सर्वाची माहिती आपल्याकडे आहे. तसेच मी शरद पवार यांना भेटल्यानंतर ज्यांच्या पोटात पोटशूळ उठला होता तेदेखील पवारांना कसा आणि कुठे संपर्क साधू पाहत आहेत, हेदेखील मला पक्के ठाऊक असल्याचे राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत म्हटलं होतं.


काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष शरद पावारांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात होतं. तेव्हा आता सत्तास्थापनेच्या या चर्चांमध्ये शेवटच्या टप्प्यात कोणता निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.