कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : इमारतीच्या आवारात रेनवॅाटर हार्वेस्टिंग करणार्‍या तसेच कचरा वर्गीकरण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायटींना मालमत्ता कराच्या देयकातील सर्वसाधारण करात १५ टक्के सवलत देण्यात आली आहे.  या संदर्भातील प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे मुंबईतील हजारो सोसायट्यांना दिलासा मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत ओला, सुका कचर्‍याचे वर्गीकरण करणे बंधनकारक आहे. त्यासाठी गृहनिर्माण संस्था, वसाहती आदींना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. अनेक इमारतींना वर्षा जलसंचयन योजना राबवणे तसेच मलजल प्रक्रिया केंद्र राबवून त्यातील पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक आहे. 


परंतु या योजनांचीही योग्यप्रकारे अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे या योजना राबवण्यासाठी सोसायटी तसेच वसाहतींना प्रोत्साहन मिळावे म्हणून मालमत्ता करात सवलत देण्याची मागणी होत होती. 


या मागणीचा विचार करत विद्यमान महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी अशाप्रकारे मालमत्ता करात सवलत देण्याचे निर्देश करनिर्धारण आणि संकलन विभागाला दिले होते. त्यानुसार करनिर्धारण आणि संकलन विभागाने पाठवलेल्या  या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. 



अशी मिळणार सवलत : 


- ओला आणि सुका कचर्‍याचे वर्गीकरण करतील, ओल्या कचर्‍याचे रूपांतर खतात करतील आणि ओल्या कचर्‍याचे रूपांतर ‘शुन्या’त करतील त्यांना मालमत्ता करात ५ टक्के सवलत


- ज्या सोसायट्या कचर्‍याचे वर्गीकरण करून सुक्या कचर्‍याचा पुनर्वापर करणार्‍या संस्थेला सोपवून विल्हेवाट लावतील, जेणेकरून त्या कचर्‍याचे प्रमाण ५० टक्क्क्यांपर्यंत खाली येईल. अशा उपक्रमासाठी ५ टक्के सवलत


- ज्या सोसायट्या त्यांच्या आवारातील सांडपाण्याचा पुनर्वापर स्वच्छता गृहासाठी करतील आणि सोसायटीत रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबवतील अशा सोसायट्यांना ५ टक्के सवलत