मुंबई: शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द आम्ही फिरवणार नाही. काम नसलेले काहीजण उगाच कर्जमाफीच्या योजनेची बदनामी करत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते सोमवारी महाविकासआघाडी सरकारच्या विस्तारीत मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, दोन लाखांपर्यंची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल, हे मी विधानसभेतच स्पष्ट केले होते. तसेच दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या आणि कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही नवी योजना आणणार असल्याचे मी सांगितले होते. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपालांच्या चमत्कारिक वागण्यावर महाविकासआघाडीचे नेते नाराज


तसेच खातेवाटप निश्चित झाले असून एक-दोन दिवसांत ते जाहीर केले जाईल. खातेवाटप हे सर्व पक्षांच्या संमतीने झाले आहे. या खातेवाटपामुळे शिवसेनेतील काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, हे तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करताना काही मर्यादा असतात, हे लक्षात घेतले पाहिजे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 


'ठाकरे सरकार'च्या शपथविधीला संजय राऊत गैरहजर, नाराज असल्याच्या चर्चांवर म्हणाले...


यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांनी काही आमदारांना शपथ घेताना हटकल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले. आमचा राज्यपालांशी कोणताही वाद नाही. मंत्रिपदाची शपथ घेताना उत्साहाच्या भरात काही आमदारांनी मातापित्याचे आणि दैवताचे नाव घेतले. पण राज्यपालांनी शपथ नियमानुसारच झाली पाहिजे, असे सांगितले. तसे झाले नसते तर आपल्याकडे आक्षेप घेणारे अनेक लोक आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.