'ठाकरे सरकार'च्या शपथविधीला संजय राऊत गैरहजर, नाराज असल्याच्या चर्चांवर म्हणाले...

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज पार पडला.

Updated: Dec 30, 2019, 04:55 PM IST
'ठाकरे सरकार'च्या शपथविधीला संजय राऊत गैरहजर, नाराज असल्याच्या चर्चांवर म्हणाले... title=

मुंबई : ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज पार पडला. पण महाविकासआघाडीचं हे सरकार अस्तित्वात येण्यासाठी ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ते संजय राऊत मात्र या सोहळ्याला गैरहजर राहिले. संजय राऊत यांचा भाऊ सुनिल राऊत यांना मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. पण या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, तर नाराज झालो असतो, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेमध्ये काही जणं काल दाखल झाले, त्यांना आश्वासन दिले असेल, म्हणून त्यांना मंत्रीपद मिळालं असेल. सरकार स्थापन करताना अशी आश्वासनं पूर्ण करायची असतात, असं संजय राऊत म्हणाले. शासकीय कार्यक्रमात मी जाण्याचं टाळतो, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

'लोकं मंत्रिपदाच्या अपेक्षा ठेवू शकतात, पण आम्ही अशा अपेक्षा ठेवत नाही. पक्ष आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पक्षासाठी काम करणं आमचं कर्तव्य आहे आणि हे आमचं बाळासाहेबांना वचन आहे. कायम पक्षाबरोबर राहू आणि पक्षवाढीसाठी योगदान देऊ', असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आदित्य ठाकरे यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.