धक्कादायक! लोकल चालवताना मोटरमनच्या डोळ्यात मिरची पूड फेकली
गाडी गोवंडी स्टेशनवरून निघतानाच, लगेच कुणीतरी अज्ञाताने मोटरमनच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली.
मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकलसाठी मोटरमनचं काम मोलाचं असतं. हजारो प्रवाशांचे जीव त्यांच्या हातात असतात. मात्र हार्बरलाईनवरील मोटरमनला अतिशय विचित्र अनुभव आला आहे. कारण कुणीतरी विकृत व्यक्तीने, मोटरमनच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. मात्र प्रसंगावधान राखल्याने, त्यांनी वेळीच ब्रेक दाबला आणि, एका मोटरमनच्या प्रसंगावधानाने हजारो प्रवाशांचे जीव वाचले आहेत. ही घटना, मध्य रेल्वेच्या हार्बरलाईनवर १३ एप्रिल २०१९ रोजी घडली.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून, हार्बरलाईनला बेलापूरसाठी निघालेली लोकल, गोवंडी स्टेशनवर थांबली. यानंतर गाडी गोवंडी स्टेशनवरून निघतानाच, लगेच कुणीतरी अज्ञाताने मोटरमनच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. गाडी स्टेशन सोडताना ही घटना घडली, मोटरमनला काहीच दिसेनासे झाले, कारण डोळ्याची आग होवू लागली. पण प्रसंगावधान राखत मोटरमन किशोर मीना यांनी वेग नियंत्रणात आणत गाडी थांबवली.
या प्रकरणी रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही अतिशय गंभीर घटना असल्याने, आम्ही आरोपीचा कसून शोध घेत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. हा आरोपी विकृत आहे, किंवा काही घातपात घडवण्याच्या उद्देश होता का, याचा शोध पोलीस घेत आहेत.