Eknath Shinde Group: लोकसभेच्या दक्षिण मुंबईच्या जागेवर दावा केल्यानंतरही स्वत:च्या पक्षाकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने काँग्रेसवर नाराज असलेले माजी खासदार मिलिंद देवरा शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याच्या हलचाली करत असल्याची चर्चा आहे. देवरांचे निकटवर्तीय मित्र आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे हे मिलिंद देवरांच्या पक्ष प्रवेशासाठी उत्सुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


देवरा नाराज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मागील आठवड्यामध्ये गिरगावमध्ये सभा घेत खासदार अरविंद सावंत यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे मिलिंद देवरा अधिक अस्वस्थ झाले. यानंतर मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियावरुन केलेल्या पोस्टमध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघात मागील 50 वर्षांपासून काम केल्याची आठवण करुन दिली. त्यामुळे या मतदारसंघावर आपला दावा प्रबळ ठरतो असा युक्तीवाद करताना दक्षिण मुंबईचा मतदारसंघ काँग्रेलाच मिळाला पाहिजे असं म्हटलं होतं.मिलिंद देवरा दक्षिण मुंबईच्या मतदारसंघासाठी आग्रही असले तरी उद्धव ठाकरे गट ही जागा सोडण्यास तयार नाही. मागील 2 निवडणुकींमध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत या मतदारसंघातू निवडून आले आहेत. देवरा आग्रही असले तरी काँग्रेस या मतदारसंघासाठी फारचा आग्रही दिसत नसल्याने देवरा नाराज आहेत.


देवरांना हवी हमी


शिवसेना जागा सोडण्यास तयार नाही आणि काँग्रेसही फार उत्सुक नसल्याने देवरा वेगळा विचार करु शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्यावेळी उद्धव ठाकरे गट या जागेवर जिंकल्याने ठाकरे गटाचा या जागेवर दावा आहे. शिंदे गटात प्रवेश करुन महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा देवरांचा इरादा असल्याचं समजतं. याचीच चाचपणी त्यांच्याकडून सुरु असल्याची चर्चा आहे. मात्र दक्षिण मुंबईचा मतदारसंघ जागावाटपामध्ये शिंदे गटाकडे असेल याची हमी देवरांना हवी असल्याचं समजतं. तरीही या जागेवरुन मतदभेद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कारण भाजपानेही इथं तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आता येथील दावा अधिक मजबूत करण्यासाठीही शिंदे गट देवरांना संधी देतो का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


दावा फेटाळला


माझी चिंता ही केवळ दक्षिण मुंबईतील कार्यकर्त्यांबाबत नाही तर ती सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांबाबत आहे. महाविकास आघाडीत जागा वाटप हे बरोबरीत झाले पाहिजे. माझ्या उमेवदारीबाबत काँग्रेस पक्ष योग्य तो निर्णय घेईल. शिंदे गट किंवा अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचारही केलेला नाही, असं देवरा यांनी या चर्चेवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय.