रेल्वेचे संकेतस्थळ क्रॅश;ऑनलाईन बुकिंगचे तीनतेरा
दुपारी चार वाजल्यापासून बुकिंगला सुरुवात होणार होती.
मुंबई: लॉकडाऊनमुळे ठप्प असलेल्या रेल्वेची प्रवासी वाहतूक १२ मे पासून सुरु करण्यात येत आहे. यासाठी आज (सोमवारी) दुपारी चार वाजल्यापासून IRCTC या रेल्वेच्या संकेतस्थळावर तिकिटांचे ऑनलाईन आरक्षण सुरु होणार होते. मात्र, रेल्वेचे हे संकेतस्थळ उघडत नसल्याच्या तक्रारी आता समोर येत आहेत. दुपारी चार वाजल्यापासून बुकिंगला सुरुवात होणार होती. मात्र, रेल्वेचे संकेतस्थळ उघडायला गेल्यास This page not working असा संदेश झळकत आहे. त्यामुळे रेल्वेने आपल्या गावी जाण्याची आस लावून बसलेल्या लोकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, रेल्वेकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एकाचवेळी अनेक लोक संकेतस्थळावर आल्यामुळे रेल्वेची साईट क्रॅश झाल्याची शक्यता आहे. मात्र, थोड्याचवेळात संकेतस्थळ पुन्हा सुरु होईल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
Corornavirus कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाची एकंदरपार्श्वभूमी पाहता सुरु असणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात पूर्णपणे बंद असणारी रेल्वे वाहतूक आता खास सुविधेअंतर्गत टप्प्याटप्पाने सुरु होणार आहे. ज्यासाठी आता प्रवाशांना अनुसरुन काही महत्त्वाची नियमावली जारी करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे तिकीट कन्फर्म असेल तरच रेल्वे प्रवास करा, असंही प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.
रेल्वे प्रवासाठी देण्यात आलेल्या काही अटींमध्येच कन्फर्म ई तिकीट असणं अनिवार्य असेल. त्याशिवाय रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय प्रवासाची सुरुवात करतेवेळी आणि प्रवासादरम्यानही सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन गेलं जाण्याची अट नमूद करण्यात आली आहे. निर्धारित स्थानकावर पोहोचल्यानंतर तेथे आरोग्य विभागाच्या आदेशांनुसार सर्व अटीचं पालन करणं प्रवाशांना बंधनकारक असेल. रेल्वेची कँटीन सेवा बंद असेल. शिवाय नेहमी देण्यात येणाऱ्या सुविधा उदा. ब्लँकेट, चादर, उशी या सुविधा पुरवण्यात येणार नाही.