परदेशातून मुंबईत येणाऱ्यांवर करडी नजर, हातावर लावला जाणार शिक्का
मुंबई महानगर पालिकेचा महत्त्वाचा निर्णय.
मुंबई : देशभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ आहे. भारतात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या १२६ पर्यंत पोहोचली आहे. भारतात कोरोना दुसऱ्या स्टेजला पोहोचला आहे. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत ३ जणांचा बळी गेला आहे. कर्नाटक, दिल्लीनंतर मुंबईत कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ४० इतकी आहे. संपूर्ण जगावर आलेल्या संकटासोबत दोन हात करण्यासाठी अनेक मार्ग अवलंबले जात आहेत.
दरम्यान मुंबईतील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. शिवाय परदेशातून मुंबई येणाऱ्या नागरिकांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. शिवाय नागरिकांच्या हाताच्या मागच्या बाजूला निळ्या शाईचा शिक्का लावण्यात येणार आहे.
मुंबई महानगर पालिकेने काही फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकांउंटवरून शेअर केले आहेत. फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'प्राऊड टू प्रोटेक्ट मुंबईकर, होम क्वारंटाइन.' असे लिहिले आहे. शिवाय ज्या व्यक्तींना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्या तळहातांच्या मागच्या बाजूस निळ्या शाईचा शिक्का लावण्यात येणार असल्याचं ट्विट मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसच्या (COVID-19) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकीदरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर १० रुपये इतका होता. मात्र, आता या तिकीटासाठी ५० रुपये मोजावे लागतील.