मुंबई: शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्तावाटपाचा तिढा काही केल्या सुटायला तयार नाही. शिवसेना मुख्यमंत्रीपदासह सत्तेच्या फिफ्टी-फिफ्टी वाटपासाठी आग्रही आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी फेटाळून लावली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेनेने भाजपशी संवाद बंद केला होता. मुख्यमंत्रीपदावर चर्चा होणार असेल तरच हा संवाद पुन्हा सुरु होईल, अशी अट शिवसेनेने घातली होती. त्यामुळे शिवसेना-भाजप यांच्यातील संवाद पूर्णपणे खंडित झाल्याचे चित्र आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, पडद्यामागे अजूनही गुप्तपणे शिवसेना आणि भाजपमध्ये संवाद सुरु आहे. यावेळी शिवसेनेकडून भाजप नेतृत्त्वापुढे दोन प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यापैकी पहिल्या मागणीनुसार भाजपचा मुख्यमंत्री करायचा झाल्यास देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी नितीन गडकरी यांना पदावर बसवावे, असे सेनेचे म्हणणे आहे. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आले असता त्यांनी ही काल्पनिक गोष्ट असल्याचे म्हटले. परंतु, ही शक्यता नाकारतादेखील येणार नाही, अशी पुस्ती जोडत त्यांनी हा पर्याय अगदीच अशक्य नसल्याचे संकेत दिले. 


'मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंना पेढा भरवायला पाहिजे होता'


याशिवाय, शिवसेनेकडून आणखी एक मागणी पुढे येताना दिसत आहे. ती म्हणजे भाजपचा मुख्यमंत्री असल्यास राज्यात एक पर्यायी समिती स्थापन करण्यात यावी. या समितीचे अध्यक्षपद उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात यावे. नाणार प्रकल्प, आरेतील वृक्षतोड यासारखा कोणताही महत्त्वाचा प्रस्ताव या समितीसमोर ठेवण्यात येईल. समितीने मंजुरी दिल्यानंतरच संबंधित प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल. जेणेकरून सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्याच हातात राहील, अशी शिवसेनेची रणनीती असल्याचे कळते. 


संजय राऊत हे बेताल आणि विदूषक; 'तरूण भारत'च्या अग्रलेखातून जळजळीत टीका


मात्र, यासंदर्भात दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही अधिकृत बोलणी झालेली नाहीत. आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये याविषयी चर्चा झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, आता सरकारच्या शपथविधीसाठी ५ किंवा ६ या नव्या तारखा निश्चित करण्यात आल्याचेही समजते.