दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई: यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दहावीचे भाषा आणि सामाजिक शास्त्र या विषयाचे अंतर्गत गुण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे यंदापासून पुन्हा एकदा एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना २० गुण तोंडी परीक्षेचे आणि ८० गुण लेखी परीक्षेचे असणार आहेत. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर बारावीच्या परीक्षा पद्धतीत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून मोठा बदल करण्यात आला आहे. पर्यावरण शास्ञाला आता गुण नव्हे तर श्रेणी देण्यात येणार आहेत. तसेच या विषयात जल सुरक्षा हा विषय नव्याने अभ्यासक्रमात दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केली. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जलसुरक्षा’ हा विषय देशाच्या पातळीवर हाती घेतला आहे. या विषयाचे महत्व विचारात घेऊन ‘जलसुरक्षा’ हा विषय अभ्यासक्रमात समाविष्टीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार इ. ९ वी ते इ. १२ वीच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.


अकरावीची वार्षिक परीक्षा अकरावीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर व बारावीची वार्षिक परीक्षा बारावीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित राहील. बीएसई मंडळाच्या धर्तीवर लेखी परीक्षेत किमान २५ टक्के बहुपर्यायी/वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे दोन्ही मंडळांतील परीक्षा पद्धतीतील तफावत दूर होण्यास मदत होईल व विद्यार्थ्यांना आवश्यक ती कौशल्ये अवगत करता येतील.