दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शालेय विभागाच्या निर्णयानंतर मोठ्या बदलांना सुरुवात
SSC Exams : दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याला केंद्रस्थानी ठेवत शालेय शिक्षण विभागानं अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. पालक आणि विद्यार्थ्यांनो वाचा ही महत्त्वाची बातमी
SSC Exams : शालेय जीवनाची पायरी ओलांडून ज्यावेळी विद्यार्थी महाविद्यालयीन आयुष्याच्या जगात पहिलं पाऊल ठेवतात तेव्हा त्यांच्यासाठी अनेक गोष्टी नवख्या असतात. काहींसाठी तर, इथं शून्यातून जग उभं करण्याइतकं मोठं आवाहन असतं. मुळात हा इतका महत्त्वाचा टप्पा असतो की, इथंच भावी जीवनाचा पाया रचला जातो. अशा अतिशय महत्त्वाच्या आणि निर्णयात्मक टप्प्यावर विद्यार्थ्यांवरील दडपण कमी करण्यासाठी आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्यातील बहुतांश शाळांमध्ये या निर्णयाच्या अंमलबजावणीस सुरुवातही झाली आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची बुद्धिमत्ता या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीनं समुपदेशन अर्थात काऊन्सेलिंग देण्याचा निर्णय घेत शालेय शिक्षण विभागानं त्या दृष्टीनं पावलंही उचलण्यास सुरुवात केली आहे.
हेसुद्धा वाचा : खेळता खेळता 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; डोंबिवली मधील हाय प्रोफाईल सोसायटीतील घटना
अॅप्टीट्युड अर्थात कलचाचणी घेऊन विद्यार्थ्यांच्या आवडीची शाखा, करिअरचा मार्ग निवडण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूनं ही योजना अंमलात आणली जात असून, 2023 -24 या शैक्षणिक वर्षात परीक्षा देणाऱ्या सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. ज्याअंतर्गत 2 लाख किंवा त्याहून जास्त विद्यार्थ्यांची कलचाचणीसुद्धा घेतली जाईल, तर मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांचं समुपदेशन शिक्षक आणि अॅपच्या माध्यमातून केलं जाणार आहे.
विद्यार्थ्यांना कसा मिळणार सुविधेचा लाभ?
दहावीची परीक्षा देण्यासाठी सज्ज असणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची अॅप्टीट्यूड चाचणी घेतली जाणार नाही. तर, करिअरच्या दृष्टीनं काही अंशी गोंधळलेल्या विद्यार्थ्यांची शिफारकस समुपदेशकाकडून केली जाईल, त्यांची अॅप्टीट्युड चाचणी घेण्यात येईल. विद्यार्थ्यांची आवड, त्यांचा एकूण कल या साऱ्याचा सांगोपांग विचार केल्यानंतरच ही चाचणी घेण्यात येईल. शासन निर्णानुसार ही चाचणी दहावीच्या परीक्षेआधी किंवा परीक्षेनंतर घेतली जाण्याची शक्यता आहे.
कधी आहेत दहावीच्या परीक्षा?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या वतीनं (Maharashtra Board) पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. ज्यानुसार बारावी बोर्ड परीक्षा (HSC Exam) ही 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 आणि दहावी बोर्ड परीक्षा (SSC Exam) ही 1 मार्च ते 26 मार्च 2024 दरम्यान घेतली जाणार आहे.