दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई : सेल्फीचं वेड कुणाला नाही. जो तो जिथं जाईल तिथं सेल्फी काढत असतो. पण प्रत्येक मोबाईलमध्ये फ्रंट फ्लॅश असतोच असं नाही. त्यामुळंच तयार करण्यात आलाय हा 'सेल्फी फ्लॅश'... आश्चर्याची बाब म्हणजे दहावीत नापास झालेल्या कृष्ण कदम नावाच्या विद्यार्थ्यानं हा सेल्फी फ्लॅश तयार केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवा परिसरात राहणारा कृष्ण कदम गेल्या वर्षी दहावीला नापास झाला होता. त्यानं दहावीची फेरपरीक्षा दिली. त्यातही तो नापास झाला, पण त्यानं जिद्द सोडली नाही. केंद्र सरकारच्या स्कील डेव्हलपमेंटमध्ये प्रोग्राममध्ये त्यानं प्रवेश घेतला. मोबाइल रिपेरींगचा कोर्स करत असताना त्यानं हा सेल्फी फ्लॅश तयार केला.


त्याच्यासोबत शिकतोय अमित शर्मा... अमितनंही गेल्या वर्षी दहावीच्या मुख्य परीक्षेला आणि नंतर फेरपरीक्षेला गटांगळ्या खाल्ल्या... त्याच्या पालकांनी त्याला प्रोत्साहन देत स्किल डेव्हलपमेंटमध्ये प्रवेश घेवून दिला. अमितनं मोबाइल रिपेरींगचा कोर्सही पूर्ण केला आणि यंदा तो ६५ टक्के गुण मिळवून दहावी पासही झाला. 


केंद्र सरकारच्या 'स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम' अंतर्गत राज्यात दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येतं. असे तब्बल ३,८०० विद्यार्थी राज्यभरात प्रशिक्षण घेतायत. यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळतो. या परीक्षेत विद्यार्थी पास झाले तर दहावी समकक्ष प्रमाणपत्र त्यांना दिलं जातं तसंच अकरावीत व्होकेशनल कोर्सला प्रवेश दिला जातो. 


दहावीला बोर्डाच्या परीक्षेत अपेक्षित निकाल लागला नाही तर अनेक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास ढासळतो. काही विद्यार्थी तर आत्महत्येसारखा टोकाचा पर्याय निवडतात. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी दहावी नापास विद्यार्थ्यांची ही यशोगाथा निश्चितच प्रेरणा देईल...