HSC SSC Exam Fees : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल काही दिवसांतच जाहीर होणार असून, आता विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. निकालांपूर्वीच्या याच वातावरणात येत्या वर्षी म्हणजेच 2024-25 या शैक्षणिक वर्षादरम्यान जे विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठीची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपलब्ध माहितीनुसार दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. छपाई आणि स्टेशनरी महागल्यामुळे दहावी बरावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळ कार्यकारी परिषदेने घेतला आहे. हे नवे दर प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट 2024 आणि मुख्य परीक्षा 2025 पासून लागू होणार आहेत. 


हेसुद्धा वाचा : पृथ्वीपासून 388000000000000 किमी दूरवर जीवसृष्टीचे संकेत? 'या' दुर्बिणीमुळं समोर आलं सत्य


 


किती रुपयांनी वाढलं परीक्षा शुल्क? 


राज्य शिक्षण मंडळ कार्यकारी परिषदेच्या वतीनं इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात 50 ते  100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सदर निर्णयानंतर 17 नंबरचा परीक्षा अर्ज, नावनोंदणी शुल्कही महागलं आहे. 17 नंबरचा अर्ज/ फॉर्म भरून खासगीरित्या दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सर्वाधिक परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. 


राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं नियमित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क 420 रुपयांवरून 470 रुपये केलं आहे. तर, 17 नंबरच्या फॉर्ममध्ये 30 रुपयांनी, तर नावनोंदणी शुल्कात 110 रुपयांची वाढ केली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी जुलै-ऑगस्ट 2024 आणि मार्च 2025 मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी सुधारित शुल्काचे दर जाहीर केले असून, आता विद्यार्थी, पालकांसमवेत शिक्षण संस्थांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरत आहे.