गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटीच्या चाकांना ब्रेक, कर्मचाऱ्यांनी उपसलं संपाचं हत्यार...काय आहेत मागण्या?
Maharashtra ST Employees Strike : राज्यभरात गणेशाच्या आगमनाची आतुरता आहे. शनिवारी आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे..गणेशभक्त मोठ्या प्रमाणात गावी जायात. त्यासाठी सर्वसामान्यांना लालपरी म्हणजेच एसटीचा आधार आहे. मात्र ऐन गणेशोत्सव तोंडावर असताना एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत..
Maharashtra ST Employees Strike : लालपरी म्हणजे एसटी बस. राज्यातल्या सर्वसामान्यांच्या प्रवासाचं हक्काचं साधन. ग्रामीण भागात तर एसटीवरच (ST Bus) दैनंदिन जीवन अवलंबून असतं. प्रवाशांच्या सेवेसाठी हे एसटीचं ब्रीदवाक्य. मात्र याच एसटीच्या चाकांना ब्रेक लागलाय. एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय. आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाची हाक कर्मचाऱ्यांनी दिलीय. (st employees strike in maharashtra)
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केलीय. 2018 ते 2024 पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी तसंच सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ मिळावी,
58 महिन्यांच्या वेतनवाढीची थकबाकी, 57 महिन्यांच्या घरभाडे भत्त्याची थकबाकी मिळावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केलीय. एसटी महामंडळाचं खाजगीकरण बंद करा, जुन्या झालेल्या बस काढून टाकत स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा, एसटी कर्मचा-यांना अद्यावत आणि सर्व सुखसोईंनी युक्त विश्रांतीगृह द्या अशा मागणी कर्मचाऱ्यांनी केल्यात.
राज्यातील 11 कामगार संघटनांच्या कृती समितीने हे आंदोलन पुकारलं आहे. राज्यभरातल्या 251 एसटी डेपोपैकी 35 एसटी डेपो पूर्णत: बंद होते. तर इतर डेपोंमध्ये अंशत: काम सुरु होतं. राज्यभरातल्या अनेक आगारांमधून सकाळी एकही एसटी बस बाहेर पडली नाही. त्यामुळे एसटीवर अवलंबून असणाऱ्यांचे, नोकरदारांचे तसंच विद्यार्थ्यांचेही मोठे हाल झाले. एसटी म्हणजे गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी चाकरमान्यांचा हक्काचा आधार. मात्र ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचा-यांकडून संपाची हाक देण्यात आल्यानं गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले.
एसटी कर्मचा-यांना अत्यल्प पगार मिळत असल्याने उदरनिर्वाह कठीण बनल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केलाय. कमी पगार, आर्थिक चणचण, वस्तीच्या ठिकाणी गैरसोयी, विश्रांतीगृह नसणे, स्वच्छ स्वच्छतागृह नसणे अशा अनेक समस्यांना एसटी कर्मचाऱ्यांना सामोरं जावं लागतं. गळक्या किंवा नादुरुस्त एसटी चालवण्याची वेळही ड्रायव्हर्सवर येते. तर कधी डिझेलचा साठा संपल्यामुळे एसटीची चाकं थांबतात..
सरकारी योजनांचा भार एसटी महामंडळावर
- महिलांना तिकीटात 50 टक्के सवलत
- ज्येष्ठ नागरिकांना तिकीटात 50 टक्के सवलत
- 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास
- अहिल्या बाई होळकर योजनेत बारावीपर्यंत मुलींना मोफत पास
- अंध आणि दिव्यांगांना 75 टक्के तिकीटात सवलत, अंध अपंगांसोबतच्या व्यक्तींना 50 टक्के सवलत
- आमदार, झेडपी सदस्य, स्वातंत्र्य सैनिक मोफत प्रवास
- एसटी महामंडळातर्फे प्रवाशांना एकूण 27 प्रकारच्या सवलती
गाव तिथे एसटी असं ब्रीद असलेली एसटी ही सर्वसामान्यांचं प्रवासाचं साधन आहे. त्यामुळे जेव्हा या लालपरीची चाकं थांबतात तेव्हा सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसतो. सरकारने यावार तातडीने तोडगा काढावा अशी मागणी प्रवासी करतायत.