ST Bus Strike : संपावर तोडगा निघणार? राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिला `हा` पर्याय
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसमोर राज्य सरकारने नवा पर्याय ठेवला आहे
मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या चौदा दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. मुंबईच्या आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात संपकरी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. एसटी संपावर चर्चा करण्यासाठी सरकारकडून कर्मचाऱ्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं.
यानुसार आज संध्याकाळी परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी शिष्टमंडळाची बैठक पार पडली. याबैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. एसटीच्या विलीनीकरणाच्या मुद्दयावर कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी तसंच आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासमवेत सविस्तर बैठक झाल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
विलीनकरणाचा मुद्दा उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या समोर आहे, 12 आठवड्यांच्या आत अहवाल मुख्यमंत्र्यांना देऊन तो पुन्हा हायकोर्टात द्यायचा आहे. हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन सरकार आणि कर्मचारी करु शकत नाहीत. आम्ही या समितीसमोर पूर्ण माहिती देतोय, संघटनांनीही आपलं म्हणणं मांडावं, तोपर्यंत हा तिढा कायम राहू नये, यासाठी राज्य सरकारने पर्याय दिला आहे.
समितीचा जो अहवाल येईल तो राज्य सरकार मान्य करेल. पण तोपर्यंत संप सुरु राहू शकत नाही. यासाठी कर्मचाऱ्यासंमोर अंतरिम पगार वाढ देऊन कामगारांना दिलासा देता येईल का असा पर्याय सरकारने दिला आहे. राज्य सरकार प्रत्येक पातळीवर प्रयत्न करतंय, एसटी संप लांबल्याने एसटी आणि कामगारांचं नुकसान होत आहे. प्रवाशी, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. पुन्हा एकदा विनंती करतो संप मागे घ्यावा, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात उद्या 11 वाजता पुन्हा बैठक होणार आहे.
विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम
दरम्यान, या बैठकीनंतर बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी विलीनीकरणाच्या मुद्दावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. पण चौदा दिवसांनंतर सरकार दोन पावलं पुढे आलेलं आहे. आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबरोबर झालेली बैठक सकारात्मक झाल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे. कर्माचाऱ्यांच्या आत्महत्या का होतायत, कर्मचाऱ्यांमध्ये का उद्रेक होतोय, याची कारणं परब यांनी आम्हाला विचारली.
यात दोन गोष्टी आहे, त्यांचा एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतर कर्मचाऱ्यांच्या बरोबरीचा नाही, आणि पगाराची शाश्वती नाही असं आम्ही सांगितलं. हे विषय सरकारच्या लक्षात आलेले आहेत. सरकारने अंतरिम पगार वाढीचा पर्याय ठेवला आहे, पण हा संप कर्मचाऱ्यांचा आहे त्यांच्याशी बोलून उद्या सकाळी पुन्हा 11 वाजात येऊ असं पडळकर यांनी म्हटलं आहे.
विलीनीकरणाच्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे पण आज पहिल्यांदा सरकारकडून प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. निलंबित झालेले कर्मचारी उद्या आझाद मैदानावर येणार असून त्यांच्यसोबत चर्चा करणार आहोत, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.