मुंबई : महाराष्ट्र एसटी कामगार संघटना व कृती समितीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारलाय.  त्याचा परिणाम जाणवत आहे. दरम्यान, एसटीचा संप चिघळणार, अशी चिन्हं आहेत. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कामावर रुजू व्हावं, अन्यथा कारवाई करू, असा इशारा सरकारनं दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐन दिवाळीत एसटीचा संप सुरू आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठीची आजची बैठकही निष्फळ ठरलीय. मुंबई सेंट्रल एसटी महामंडळात नुकतीच परिवहन मंत्री दिवाकर रावते, परिवहन आयुक्त प्रविण गेडाम आणि एसटीचे अधिकारी यांची बैठक झाली. य़ा बैठकीतच सरकारनं हा इशारा दिलाय. 


मुंबईतही शुकशुकाट


एसीटच्या संपामुळे औरंगाबाद मुख्य बस स्थानकावर शुकशुकाट पाहायला मिळतोय सकाळ पासून एकही गाडी या डेपोतून बाहेर पडली नाही, औरंगाबाद बस स्थानकावर बिकट अवस्था आहे. तर मुंबईतही तिच परिस्थिती आहे. एसटीच्या संपामुळे मुंबईत परळ डेपोमध्ये सगळ्या बसेस उभ्या होत्या. त्यामुळे प्रवासीही खोळंबले आहेत. परळमधल्या डेपोमध्ये अनेक गाड्या उभ्या आहेत.


रत्नागिरीत ग्रामीण भागात फटका


या संपाचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यात देखील बघायला मिळत आहे. रत्नागिरीच्या ग्रामीण भागात एकही एसटी आज धावली नाही त्यामुळे अनेक प्रवासी आज एसटी डेपोत ताटकळत बसले होते तसेच प्रवाशांना माहिती देण्यासाठी एकही अधिकारी डेपोत आज उपस्थित नव्हता त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत होता. कोकणच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून एसटी कडे बघितलं जातं मात्र ह्याच एसटीची वाहतूक पूर्ण पणे ठप्प असल्यामुळे सर्व व्यवहार पूर्णपणे बंद झालेले पाहायला मिळाले. जिल्हयातील सर्वच एसटीचे डेपो बंद असल्यामुळे प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झालेत.


कोल्हापुरात कर्नाटकच्या बस रोखल्यात


कोल्हापुरात एसटीच्या चालक आणि वाहकांच्या संघटनांनी कर्नाटक परिवहनच्या बसेसही थांबवल्या आहेत. कर्नाटक परिवहन मंडळाच्या कोल्हापुरात दाखल झालेल्या गाड्या राज्यात पुढे जाऊ न देण्यावर संपकरी ठाम आहेत. कर्नाटकच्या चालक आणि वाहकांनी राज्यात कुठेही गाड्या नेण्याचा प्रयत्न केला, तर गाड्यांच्या काचा फोडण्याची धमकी  संपकरी संघटनांनी दिली. य़ाशिवाय अनेक बसेसची हवा देखील काढून घेण्यात आली. 


नाशिक डेपोमधून एकही बस नाही!


एस टी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका एस टी प्रवाशांना बसू लागलाय. मध्यरात्रीपासून नाशिक शहरातल्या बस डेपोमधून एकही बस बाहेर गावी गेलेली नाही. त्यामुळे प्रवाशांचे पुरते हाल होतायत.  पोलीस बंदोबस्तात बस सुरु राहतील, असं आश्वासन सरकारनं दिलं होतं मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. 


संपामुळे पर्यटक अडकलेत


एसटीच्या संपामुळे औरंगाबादमधल्या अजिंठा लेण्यांवर गेलेल्या पर्यटकांचे हाल झालेत.  अजिंठा लेण्यांजवळ घेऊन जाणाऱ्या इको बससुद्धा बंद आहेत. पर्यटकांसाठी काही जणांनी बैलगाडीची सोय केलीय.  मात्र ते 500 रुपये मागतायत.  मुख्य शहरात परत येण्यासाठी कुठलीही सोय नसल्यानं पर्यटकांचे हाल होतायत. अखेर अनेक पर्यटकांना पायी परतावं लागतंय. 


... संप सुरुच राहणार, ७ वा वेतन आयोग नाही! 


पगारवाढ, वाढीव बोनसची मागणी यासह विविध मुद्यांवर पुकारलेल्या बेमुदत संपावर एस टी कर्मचारी ठाम आहेत. सरकार जो पर्यंत कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करणार नाही तो पर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार चालक आणि वाहकांनी केलाय. दरम्यान एसटी कर्मचा-यांची मागणीनुसार सातवा वेतन आयोग पुढची पंचवीस वर्ष लागू होईल अशी परिस्थिती नाही,  असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलंय. शिवाय संप राजकीय असल्याची टीकाही रावते यांनी केलीय.