Video: वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी; अनेक प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

Stampede At Bandra Railway Station: वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये झालेल्या या दुर्घटनेमध्ये 9 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 27, 2024, 10:09 AM IST
Video: वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी; अनेक प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर title=
वांद्रे रेल्वे स्थानकात घडली ही दुर्घटना (फाइल फोटो)

Stampede At Bandra Railway Station: पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील प्रमुख स्थानकांपैकी एक असलेल्या वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. वांद्रे टर्मिनस येथे घडलेल्या या दुर्घटनेमध्ये 9 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना भाभा रुग्णालयामध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी सहाच्या सुमाराच सदर प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.

किमान नऊ जखमी

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लांब पल्ल्याच्या ट्रेन सुटणाऱ्या वांद्रे टर्मिनस येथून सुटणारी वांद्रे-गोरखपूर ट्रेन पकडण्यासाठी स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली. त्यातही प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर मोठ्या संख्येनं एकाच वेळेस प्रवासी आल्याने चेंगराचेंगरी झाली. यामध्ये किमान नऊ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून सर्वांवर भाभा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. दिवाळीनिमित्त वांद्रे स्थानकातून विशेष ट्रेन सोडल्या जात आहेत.

रेल्वे प्रशासनाचा गाफीलपणा जबाबदार?

छटपूजा आणि दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने लोक आपआपल्या घरी जाण्यासाठी गर्दी करतात. अशाच गर्दीमध्ये ही चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीचे व्हिडीओ समोर आले आहेत. अंगावर शहारे आणणारी दृष्य या व्हिडीओंमध्ये पाहायला मिळतात. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली असून जखमींची संख्या वाढेल अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. जखमींपैकी काहींना मार लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासनाचा गाफीलपणा यासाठी जबाबदार आहे का अशी चर्चा आता होऊ लागली आहे. 

सकाळी 6 वाजताची ही घटना आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत करण्यासाठी मदत केली. या रेल्वे स्थानकावर आता गर्दी होणार नाही याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे. 

सणासुदीनिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मुंबईमधून या उत्तरेकडील राज्यांसाठी अतिरिक्त रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. अशीच एका स्पेशल ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडाल्याने ही दुर्घटना झाली.

एल्फिस्टन रोड दुर्घटनेची आठवण

या दुर्घटनेमुळे एल्फिस्टन रोड (सध्याचं प्रभादेवी रेल्वे स्थानक) रेल्वे स्थानकावर 29 सप्टेंबर 2017 रोजी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये एकूण 23 जणांचा मृत्यू झाला होता.