दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'मातोश्री' या त्यांच्या निवासस्थानी शिवबंधन बांधून गडाख यांनी शिवसेना पक्ष प्रवेश केला. या प्रसंगी सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना नेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर आता गडाखांवर या जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गडाख यांच्या शिवसेना प्रवेशामध्ये मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राठोड यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी गडाख यांना शिवसनेत प्रवेश देऊन त्यांच्या हाती नगर जिल्ह्याचा कार्यभार सोपवण्यात आला.


शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात याबाबतच्या बऱ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. गडाख हे नगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. 



गडाख यांनी दिलेला पाठिंबा पाहता, शिवसेनेनं त्यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करून घेत कॅबिनेट मंत्रीपद दिलं होतं. ज्यानंतरस आता त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे