राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक, खातेवाटपावर प्रश्नचिन्ह कायम
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. संध्याकाळी ४ वाजता होणाऱ्या या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. संध्याकाळी ४ वाजता होणाऱ्या या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांबरोबरच शहरी भागाशी संबंधितही काही निर्णय आजच्या बैठकीत घेतले जाण्याची शक्यता आहे. शासकीय योजनेत एक व्यक्ती एक घर या धोरणाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्याची शक्यता आहे. या बैठकीआधी मंत्र्यांचं खातेवाटप होणार का हा मोठा प्रश्न आहे.
१६ डिसेंबरपासून नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात फक्त सहा मंत्री आहेत. त्यांचे खातेवाटपही अजून झालेले नाही. त्याचबरोबर तीन पक्षांमध्ये सत्तावाटपाचे जे सूत्र ठरले आहे, त्यानुसार त्यात्या पक्षांचे मंत्री कोण होणार, यावर अजून निर्णय व्हायचा आहे.
अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, असा काँग्रेसचा आग्रह आहे. त्यादृष्टीने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सोमवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले आहेत. मंत्रीपदी कुणाकुणाची वर्णी लावायची, यासाठी काँग्रेसमध्ये वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरु असल्याचे समजते.