राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर; काय आहेत अटी?
State Government Strike : वर्षाच्या अखेरीस राज्य सरकारी कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारी असून, यावेळी संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा मोठा आहे.
State Government Strike : यंदाच्या वर्षी विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संपाची हाक दिल्याचं पाहायला मिळालं. एसटी कर्मचारी, बीएसची कर्मचारी या आणि अशा बऱ्याच कर्मचाऱ्यांनी संपाची हाक देत प्रशासनाचा खडबडून जागं केलं होतं. आता 2023 या वर्षाचा शेवटही यातच संपानं होणार आहे. कारण, एकदोन नव्हे, तब्बल 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी संपावर जाणार आहेत. 14 डिसेंबरपासून हा संप सुरु होणार असून, या बेमुदत संपाच्या माध्यमातून ते बऱ्याच मागण्या उचलून धरणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
जुन्या पेन्शनसह इतर 17 मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी 14 डिसेंबरपासून पुन्हा बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्यातील 17 लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याचा दावा समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आला असून, मार्च महिन्यात झालेल्या सात दिवसांच्या संपानंतर, आश्वासनं देऊनही त्यांची पूर्तता न झाल्यामुळं कर्मचारी संघटनेनं संपाची हाक दिली आहे.
काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
राज्य शासनाच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवी पेन्शन योजना रद्द करून सरसकट सर्वांनाच जुनी पेन्शन योजना जुन्या प्रभावानं लागू करण्यात यावी, कंत्राटी आणि योजना कामगार हे प्रदीर्घ काळ सेवेत असल्यामुळे त्यांना समान किमान वेतन मिळावं, शिवाय त्यांच्या त्यांच्या सेवा नियमित कराव्यात, विविध विभागांमध्ये असणारी सर्व रिक्त पदे भरावीत. अशा मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.
हेसुद्धा वाचा : पालकांनो मुलं शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना 'हे' प्रश्न नक्की विचारा
वरील मागण्यांसोबतच आरोग्य विभागाला प्राधान्य देण्यात यावं, चतुर्थश्रेणी आणि वाहनचालक कर्मचाऱ्यांच्या भरतीला केलेला रोखून धरू नये, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या तत्काळ कराव्यात, कोविड काळात मृत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपासाठी वयात सूट द्यावी, केंद्र शासनाप्रमाणे आनुषंगिक भत्ते द्यावेत, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करण्यात याव्यात, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न सोडवण्यात यावेत शिवाय नवीन शैक्षणिक धोरण रद्द करण्यात यावं अशागी मागण्यांचा यात समावेश आहे. परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांचं निराकरण करण्याव्यतिरिक्त 80 ते 100 वर्षे वय असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये केंद्र शासनाप्रमाणं वाढ करून निवृत्तीचं वय 60 वर्षे करावं या मागण्यांसाठी हा बेमुदत संप असून, कर्मचारी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
सदरील संपासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात आलं असून, 14 डिसेंबरला संप सुरु झाल्या क्षणापासून मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही अशीच भूमिका कर्मचाऱ्यांनी मांडली आहे.