महाविकासआघाडीतील आणखी एका मंत्र्यांची कोरोनावर मात
अखेर रुग्णालयातून ते घरी परतले आहेत
मुंबई : देशभरात कोरोना व्हायरसची लागण होणाऱ्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. दर दिवशी संपूर्ण देशात हजारो संख्येनं नवे कोरोनाबाधित असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात येत आहे. देशात ही परिस्थिती असतानाच राज्यातही चित्र जवळपास एकसारखंच आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन आणि आरोग्य यंत्रणाही या संसर्गावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांच आहे. अगदी राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्रीसुद्धा कोरोनाविरोधातीय या युद्धाच उतरले आहेत.
कोरोनाशी युद्ध सुरु असतानाच त्याच्या विळख्यातून महाविकासआघाडीतील मंत्रीही दूर राहू शकले नाहीत. काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण होणाऱ्या मंत्र्यांमध्ये राज्याच्या नगरविकासमंत्री पदावर असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनाही या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती.
कोरोनाची लागण झाल्याचं कळताच शिंदे यांच्यावर तातडीनं उपचार सुरु झाले. परिणामी त्यांनी या विषाणूवर यशस्वी मात करत कोरोनाला हरवलं आहे. शिंदे यांची दुसरी कोविड चाचणी निगेटीव्ह आल्यामुळं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
Coronavirus ची लागण झाल्यानंतर उपचार सुरु असतानाही शिंदे यांनी रुग्णालयातूनही आपलं काम सुरुच ठेवलं होतं. सोशल मीडियावर त्यांच्या यादरम्यानचा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला होता. लोकोपयोगी कामांमध्ये अडथळा येऊ नये यासाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय अनेकांची मनं जिंकून गेला. एकनाथ शिंदे आता कोरोनावरील उपचारांनंतर स्वगृही परतल्यामुळं समर्थकांमध्ये आनंद तर आहेच. पण, येत्या काळात आता नव्या जोमानं ते राज्याप्रती आणि जनतेप्रती असणारी जबाबदारी कशी पार पाडतात याबाबतची अनेकांमध्ये उत्सुकता आहे.