मुंबई : coronavirus कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे पासून सुरु होत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या तीन टप्प्यांहून हा चौथा टप्पा वेगळा असणार आहे, असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. ज्यानंतर आता महाराष्ट्रात या चौथ्या टप्प्यात नेमकं कसं चित्र असेल याची माहिती खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी २४तासचे संपादक आशिष जाधव यांना दिलेल्या मुलाखतीत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे सर्वांपुढे मांडले. यातच त्यांनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याविषयीच्या प्रश्नाचंही उत्तर दिलं. या टप्प्यात ग्रीन झोन पूर्णपणे सुरु राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर, ऑरेंज झोनमध्येसुद्धा कंटेन्मेंट क्षेत्र वगळता इतर भाग हा सुरु केला जाऊ शकतो. राज्यात अनेक जिल्हे आणि गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळलेले नाहीत. त्यामुळे या भागांमध्ये बऱ्याच अंशी लॉकडाऊनला शिथिलता दिली जाऊ शकते असं ते म्हणाले. 


अमुक एक भाग रेड झोनचा जिल्हा असला तरीही अशा ठिकाणी कंटेन्मेंट झोन वगळता इतर सर्व भागांमद्ये व्यवसाय आणि उद्योग पूर्णपणे सुरु रहावेत असं आपलं ठाम मत असल्याचं राजेश टोपे म्हणाले. रेड झोनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना इतरत्र वावरण्याची मुभा मिळणार नाही हा अतिशय महत्त्वाच मुद्दा त्यांनी स्पष्ट केला. कोणीही उठावं कुठेही फिरावं, असं बेजबाबदार वर्तन अजिबात खपवून घेतलं जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. 


CORONA : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची अशी सुरु आहे तयारी 


 


लॉकडाऊनच्या या टप्प्यात ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये अनेक कारभार सुरु करावे लागतील. पण, यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा मंत्र मात्र आवर्जून पाळला गेलाच पाहिजे हाच मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा कुठेही उडवला जात असल्याचं लक्षात आल्यास त्या ठिकाणी लागू करण्यात आलेले नियम पुन्हा कठोर करण्यात येतील अशी माहिती टोपे यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीचे सर्व अधिकार असल्याची बाब त्यांनी मांडली. 



लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर त्यातही जर कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसला तर, ऑरेंज आणि ग्रीन अशा झोमध्येही लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यात येईल असं म्हणत वास्तवदर्शी परिस्थिती आरोग्यमंत्र्यांनी सर्वांपुढे ठेवली. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काही निर्णय घेतले जाणार असले तरीही यामध्ये नागरिकांचे प्राणही त्याहून महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सुवर्णमध्य साधतच पुढची पावलं उचलली जाणार असल्याचं म्हणत राजेश टोपे यांनी लॉकडाऊनचा चौथा टप्पा कसा असेल याबाबतची माहिती दिली.