मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात पावसाळ्याच्या अनुषंगाने आपत्कालीन व्यवस्थापन विषयक एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीत आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली.  पावसाळ्यादरम्यान लोकल ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी पर्यायी नियोजन करण्याबाबत या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली.


पावसाळ्यादरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यास अशावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसंच त्यांना योग्य ती मदत वेळच्यावेळी मिळावी, यादृष्टीने अधिक प्रभावी कार्यवाही करण्याच्या आणि त्यासाठी सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. या सुचनेनुसार अधिक परिपूर्ण नियोजन करण्याची कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर करण्यात येत आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिली. 


लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्यास अशाप्रसंगी प्रवाशांना आपल्या नजिकच्या परिसरात पोहोचता यावं, यासाठी एसटी आणि बेस्ट बसेसची पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


नागरिकांच्या सुविधेसाठी 400 जादा बसेस वेगवेगळ्या ठिकाणांहून सोडण्याची बेस्टने तयारी दाखवली आहे. तर 11 जादा बसेस सोडण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली.


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभागांच्या स्तरावर आणि इतर संबंधित संस्थांच्या स्तरावर समन्वय अधिकारी नेमण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी यापूर्वी दिले होते. त्यानुसारी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे देण्यात आली.


लोकल ट्रेन बंद असण्याच्या परिस्थितीत प्रवाशांना आवश्यकतेनुसार प्राथमिक वैद्यकीय उपचार आणि इतर आवश्यक मदत देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 


लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्यास प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यासह आवश्यक ती मदत योग्यप्रकारे मिळावी, यादृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभागांनी त्यांच्या स्तरावर रंगीत तालीम (मॉक ड्रील) आयोजित करण्याचे महानगरपालिका आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.