केंद्राचा कायदा अडचणींचा वाटत आहे तर राज्यात तुम्हाला सोईचा कायदा करा - मुनगंटीवार
कृषी कायद्याच्या विरोधकांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला आहे.
मुंबई : कृषी कायद्याच्या विरोधकांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला आहे. 'देशात झालेल्या विविध निवडणुका-पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे केंद्रातील विरोधी पक्ष हादरले आहेत. म्हणून आता शेतकरी आंदोलनला पाठिंबा देत आहेत.' असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
'काँग्रेस नेत्यांना या कायद्याच्या विरोधात टीका करणाऱ्यांना राजकीय अलमायझर झाला आहे का? कपिल सिब्बल यांनी तर संसदेत 2013 ला जोरदार भाषण केलं होतं. शरद पवार साहेबांनी पण याच कायद्याच्या अनुषंगाने पत्र लिहिलं होतं.' असा प्रश्न देखील मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.
'जर केंद्राचा कायदा अडचणींचा वाटत आहे तर राज्यात तुम्हाला सोईचा होईल असा कायदा करा ना. आम्ही 2014 नंतर राज्यात शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे केले त्यामुळे कुठे नुकसान झाल्याचं ऐकिवात नाही.' असं देखील त्यांनी विरोधकांना सुनावलं आहे.
'मनसेला बरोबर घेण्याचा आत्ता कोणताही विषय नाही, तशी नुकत्याच झालेल्या कोर कमिटीबाबत चर्चाही झालेली नाही, पण समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा पर्याय - शक्यता राजकारणात प्रत्येक पक्ष नेहमी करत असतो, मात्र आता असा कोणताही विषय नाही.' अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी मनसेसोबत युतीबाबत दिली आहे.