मनेका गांधी यांचे वाघिणीवरचे प्रेम बेगडी; सुधीर मुनगंटीवारांनी फटकारले
...तर मुख्यमंत्र्यांवर दबाव आला असता
मुंबई: यवतमाळमधील अवनी वाघिणीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना सुधीर मुनगंटीवार यांनी फटकारले. अवनी वाघिणीबद्दलचे आमच्याच पक्षाच्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचे प्रेम बेगडी आहे, अशा शब्दांत त्यांनी मनेका गांधी यांना लक्ष्य केले.
पांढरकवडा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या अवनी या वाघिणीला वनखात्याने काही दिवसांपूर्वी गोळ्या घालून ठार केले होते. वनखात्याची ही कृती नियमांचे उल्लंघन करणारी असून यावरुन वन्यप्रेमींना सरकारला धारेवर धरले होते.
या पार्श्वभूमीवर मनेका गांधी यांनी महाराष्ट्र सरकारविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुधीर मुनगंटीवार यांना राज्य मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केली होती.
याविषयी विचारणा केली असता मुनगंटीवार यांनी मनेका गांधी यांच्या मागणीची अक्षरश: खिल्ली उडवली. मनेका यांनी मुख्यमंत्र्यांना माझा राजीनामा घेण्याचे पत्र पाठवले. परंतु, या पत्रात जर मनेका यांनी, मुनगंटीवार यांनी राजीनामा दिला नाही तर मी राजीनामा देईन असे म्हटले असते तर, मुख्यमंत्र्यांवर चांगला दबाव आला झाला असता. आता मला मंत्रिमंडळातून नाही काढले तर मनेका यांचा अवमान नाही का होणार, असा खोचक सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.