मुंबई : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ. सुजय विखे-पाटील यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सुजय सारखा तरूण युतीत आला, त्यांचं स्वागत असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. तर शिवसेना भाजपच्या नेत्यांनी एकमेकांना भेटायला हवे, अशी प्रतिक्रिया सुजय विखेंनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर दिली आहे. मी माझ्या पोरांबरोबरच इतरांच्या पोरांचे लाड करतो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी आज लगावला. आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार की नाही, यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. बाळासाहेबांनी माझ्यावर कोणतेही बंधन टाकेले नव्हते, मग मी का त्याच्यावर टाकावे? निवडणूक लढवायची की नाही हा निर्णय आदित्य घेईल. पण यावेळी आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार नाही, असे त्यांने स्पष्ट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवारांवर भाष्य करताना उद्धव म्हणालेत, पवारांच्या नितीला शोभेल असेच त्यांची वक्तव्य असतात. जसे आम्ही म्हणतो की, जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि ते जे बोलतात त्याच्या नेमके उलटे समजायचे असते. मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असे भाष्य पवारांनी केले. यावर पवार हे, ज्योतिष कधी झालेत, असा टोला त्यांनी लगावला.


दरम्यान, सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत लाथाळ्या सुरु झाल्या आहेत. विखे सुजयला का रोखू शकले नाहीत, असा सवाल बाळासाहेब थोरातांनी उपस्थित केला आहे. पक्षाने जबाबदारी दिल्यास विरोधी पक्षनेतेपद सांभाळण्याचे संकेत, त्यांनी यावेळी दिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विखेंचे विरोधक बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर हल्लाबोल केलाय.


राधाकृष्ण विखे पाटलांनी सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशाचा समोर येऊन सगळ्यात आधी निषेध करायला हवा होता, अशा शब्दांत थोरातांनी टीका केलीय. काँग्रेसने विखे कुटुंबीयांना आतापर्यंत भरभरून दिलंय. मात्र पुत्र हट्ट करतो म्हणून दुसऱ्या पक्षात जाणे हे विखेंना शोधणारं नाही असंही थोरातांनी म्हटले आहे. तसेच राधाकृष्ण विखे राजीनामा देऊन भाजपत गेले तर विरोधी पक्षनेतेपद सांभाळण्यास तयार असल्याचंही थोरातांनी सांगितले आहे.