पालिकेच्या मुख्य लेखापालांची राज्य सरकारकडून `घर वापसी`
महापालिकेचे मुख्य लेखापाल सुरेश बनसोडे यांना राज्य सरकारला अवघ्या वर्षभराच्या आत पुन्हा आपल्या सेवेत माघारी बोलवून घेण्याची नामुष्की ओढवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
मुंबई : महापालिकेचे मुख्य लेखापाल सुरेश बनसोडे यांना राज्य सरकारला अवघ्या वर्षभराच्या आत पुन्हा आपल्या सेवेत माघारी बोलवून घेण्याची नामुष्की ओढवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
पण, ही नामुष्की का ओढवली? याचे स्पष्टीकरण महापालिका आणि राज्य सरकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून होणे आवश्यक आहे.
महापालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिेलेल्या माहितीनुसार, बनसोडे यांनी प्रशासकीय कामकाज योग्य प्रकारे हाताळले नाही, असा ठपका ठेवत त्यांची सेवा पुन्हा राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आली आहे.
महापालिका अधिनियमातील दुरुस्तीनुसार लेखापाल पदी राज्य शासनाच्या फायनान्स विभागाच्या जॉईंट डायरेक्टरची नेमणूक करण्यात यावी, असा निर्णय झाला होता. ज्याला महापालिकेतील अधिकाऱ्यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र, त्यावरची स्थगिती न्यायालयानं हटवल्यानं सरकारनं बनसोडे यांना महापालिकेच्या मुख्य लेखापालपदी पाठविलं होतं.
मात्र, महापालिका आयुक्तांनी काल बनसोडे यांना महापालिकेच्या सेवेतून मुक्त करत पुन्हा राज्य सरकारकडे पाठवलं. त्यामुळे महापालिका प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
मध्यंतरी एका प्रकरणात बनसोडे यांची चौकशी सुरु होती. त्यामुळेच तर त्यांना महापालिकेनं सेवेतून मुक्त केलं गेलं का? आणि राज्य सरकारनं त्यांना पुन्हा माघारी बोलवलं का? अशी जोरदार चर्चा सुरु झालीय.