Rising Inflation : उठा उठा महागाई आली, साबणाने आंघोळ करायची चोरी झाली
पेट्रोल-डिझेल दरवाढीपाठोपाठ महागाईचा आणखी भडका, आंघोळीच्या साबणासह डिटर्जंट पावडरही महागली
ऋचा वझे, झी मीडिया, मुंबई : पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी सिलेंडरच्या दरवाढीमुळं आधीच महागाईचा भडका उडाला आहे. त्यात दैनंदिन वापरातल्या ग्राहकोपयोगी वस्तूंचेही भाव वाढले आहेत.
घरातल्या दैनंदिन वापराच्या वस्तू देखील महाग झाल्यात. अगदी आंघोळीचा साबण आणि कपडे धुण्याची डिटर्जंट पावडर आणि वडी देखील. त्यामुळं नहाना-धोना अगदी मुश्कील होऊन गेलंय.
हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीनं गेल्या महिनाभरात अंघोळीचा साबण आणि डिटर्जंटच्या किंमतीत तब्बल 3 ते 14 टक्के वाढ केली आहे. कच्चा मालाच्या किंमती वाढल्यानं उत्पादनांच्या किंमती वाढवण्याची वेळ आल्याचं कंपनीचं म्हणणंय.
दैनंदिन वापराच्या वस्तू महाग
सर्फ एक्सेल ईझी वॉशची किंमत 14 टक्क्यानं वाढलीय त्यामुळे एका किलोच्या पॅकसाठी 114 रुपये मोजावे लागतील. तर आधी 56 रुपये किलोनं मिळणारी व्हील डिटर्जंट पावडर आता 58 रुपये किलो झालीय. 10 रुपयांच्या व्हीलमध्ये आधी 150 ग्रॅमची वडी मिळायची. आता केवळ 130 ग्रॅमची वडी मिळणारा आहे. रिन डिटर्जंट पावडरसाठी आता 77 रुपयांऐवजी 82 रुपये मोजावे लागतील. लक्सचा 5 साबणांचा पॅक आता 120 रुपयांऐवजी 130 रुपयांना मिळेल, तर लाईफबॉय 8 टक्क्यानं महाग झाला आहे.
वाढत्या महागाईनं आधीच सामान्य ग्राहकांना घाम फुटलाय. पण आता घाम आलाय म्हणून आंघोळ करण्याची किंवा कपडे धुण्याची देखील सोय राहिलेली नाही. .ही महागाईची डायन अंगावरचं उरलं सुरलं देखील घेऊन जाते की काय, या भीतीनं ग्राहकांना ग्रासलंय.