नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील ड्रग्ज कनेक्शनचा शोध घेतला जात आहे. नारकोटीक्स कंट्रोल ब्यूरोने शुक्रवारी दिवसभराच्या चौकशीनंतर रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना अटक केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज रियाला देखील चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते आणि तिला अटक देखील होऊ शकते. कारण एनसीबीसमोर केलेलं विधान हे कोर्टाच्या समोर केलेल्या विधानाप्रमाणे ग्राह्य धरलं जातं.



शौविकचं विधान 


एनसीबीने केलेल्या चौकशी दरम्यान शौविक आणि सॅम्युअलला ड्रग्ज चॅटचे पुरावे दाखवण्यात आले. सॅम्युअल मिरांडाने शौविकच्या सांगण्यावरुन ड्रग्ज मागवले होते असे या चौकशी दरम्यान समोर आले. तर आपण रियाच्या सांगण्यावरुन ड्रग्ज आणल्याचे शौविकने सांगितले. शौविकचे हे विधान रियाच्या अटकेचे कारण झालंय. 


एनसीबीने रात्री उशीरा सुशांतचा कर्मचारी दीपेश सावंत याला देखील कार्यालयात बोलावले. शौविक आणि सॅम्युअलला आज एनसीबी कोर्टात सादर करुन दोघांच्या रिमांडची मागणी करु शकते.


याप्रकरणी आत्तापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. याआधी एनसीबीने अब्बास, करण, जैद, बासित आणि कैजान यांनाही अटक केली आहे. यापैकी अब्बास आणि करण यांना जामीन मिळाला आहे.


शुक्रवारी एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीला आणि सॅम्युअल मिरांडला चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशीमध्ये सॅम्युअल मिरांडाने सुशांतसाठी ड्रग्ज घेत असल्याचं कबूल केलं, असं एनसीबीने सांगितलं आहे. एनसीबीने चौकशीनंतर शोविक आणि सॅम्युअलला अटक केली. 


एनसीबीने याप्रकरणी आत्तापर्यंत ५९ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. अब्बास रमजान लखानीकडून ४६ ग्रॅम आणि करण अरोराकडून १३ ग्रॅम गांजा मिळाला आहे. याप्रकरणात इलेक्ट्रॉनिक पुरावे जास्त असले तरी गांजाचं प्रमाण फक्त ५९ ग्रॅम आहे, असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. ड्रग्जचे पैसे देण्यासाठी गुगल पे वापरण्यात येतं होतं, अशीही माहिती तपासात समोर आली आहे.