दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी पोलीसांनी केलेल्या तपासाबाबत संशय व्यक्त करणाऱ्या अनेक तक्रारी आल्या असून या तक्रारींची एसआयटीमार्फत चौकशी करणार असल्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी झी २४ तासशी बोलताना दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात भाजपाचं सरकार जाऊन महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आल्यानतंर भीमा-कोरेगाव दंगलीतील पोलीसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित करणाऱ्या अनेकांनी नव्या सरकारकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्र लिहलं आहे. भीमा कोरेगाव दंगल हे तत्कालीन भाजप सरकारचे षडयंत्र होते असा गंभीर आरोप शरद पवार यांनी या पत्रात केला आहे.


भीमा कोरेगाव दंगलीतील पोलीस तपासाबाबत भाजपाचे सरकार असतानाच प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. सरकार बदलल्यानंतर यातील अनेकांनी नवे गृहमंत्री अनिल देशमुख तसंच सरकारमधली अनेकांकडे तक्रारी केल्या आहेत. या सगळ्या तक्रारींची शहानिशा केली जाईल. तसंच याची चौकशी करण्यासाठी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.


याप्रकरणी झी २४ ताससी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी भाजप सरकारने पोलिसांचा गैरवापर केल्याचा आरोप होतोय. भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीकडे संशयाने पाहिलं जातंय, याप्रकरणी आमच्याकडे अशी अनेक निवेदनं आली आहेत. भाजपच्या विचाराच्या विरोधात जाऊन कुणी विचार मांडले की त्याला अर्बन नक्षल म्हणायचे ही भूमिका मागच्या भाजप सरकारची होती. याची योग्य ती चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली जात असल्याचंही देशमुख यांनी सांगितलं.