Swiggy Riders Strike In Mumbai: मुंबईत पुढील काही दिवस फुड डिलिव्हरी सर्व्हिसवर परिणाम होण्याची शक्यता आहे. फुड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीसोबत जोडले गेलेल्या कर्मचाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी संपावर गेले आहेत. यामुळं मुंबईतील काही परिसरात स्विगीच्या सेवांवर परिणाम झाला असून आंदोलनामुळं इन्स्टामार्ट डिलिव्हरीला देखील फटका बसला आहे. 8 ऑक्टोबरपासून स्विगीच्या डिलिव्हरी बॉयचा संप सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय कर्मचारी सेनेने सर्वात पहिले आंदोलनाचे हत्यार उपसले होते त्यानंतर अन्य काही डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी स्विगीविरोधात वांद्रे येथे आंदोलनासाठी जमले होते. या विरोधानंतर मुंबईतील अन्य परिसरातही स्विगीविरोधात आंदोलन पुकारण्यात आलं. डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण शहरात आंदोलन केली आहेत. CNBC-TV18च्या रिपोर्टनुसार, कमी वेतन आणि काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा करावी, या मागणीसाठी स्वीगीच्या डिलिव्हरी बॉयनी आंदोलनासाठी उतरले आहेत. एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला एका डिलिव्हरी बॉयकडे 4 किमीपर्यंतचा परिसर होता मात्र आता तो वाढवून 6 किमीपर्यंत केला आहे. मात्र, वेतनात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाहीये.


वांद्रा येथील एका डिलिव्हरी बॉयने म्हटलं आहे की, कंपनीने आता आम्हाला दादर आणि त्याच्या पुढील परिसरातील ऑर्डर देत आहेत. मात्र, त्या ऑर्डरसाठी फक्त 20 ते 25 रुपये मिळतात. लांबच्या ऑर्डरवर आम्हाला जास्त कमाई मिळत नाही, असं त्याने म्हटलं आहे. तर, आणखी एका कर्मचाऱ्याने म्हटलं आहे की, कंपनीकडून प्रोत्साहनदेखील मिळत नाही. कधी कधी चांगली कमाई करण्यासाठी व दिवसाला जास्त प्रमाणात ऑर्डर मिळाव्यात यासाठी पहाटे 3 वाजल्यापासून काम करण्याची सक्ती केली जाते. 



पेट्रोलच्या किंमती वाढल्या आहेत त्यामुळं मोठ्या मेहनतीने हातात काही पैसे उरतात. आम्हाला काम करण्यासाठी अधिक सुधारणा करण्याची गरज आहे, असंही एका कर्मचाऱ्याने म्हटलं आहे. वर्ल्डकप सुरू असतानाच ऑर्डरमध्ये वाढ होण्याची शक्यता असतानाच स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने आंदोलनाचे हत्यार उपसल्याने कंपनीसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.  मात्र, आंदोलन सुरू असतानादेखील डिलिव्हरी सर्व्हिसला अद्याप कोणताही फटका बसलेला नाहीये, अशी माहिती समोर येतेय.