मुंबईकरांनो सावधान!; स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण वाढतायत, आठवड्याभरात इतक्या रुग्णांची नोंद
सात रुग्णांच्या मृत्यूनंतर वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्येत घट होत असतानाच दुसरीकडे स्वाईन फ्लूच्या (Swine flu) रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. पाऊस सुरु झाल्यापासून स्वाईन फ्लूचा फैलाव वेगाने होत आहे. मुंबईतही (Mumbai) स्वाईन फ्लूची दहशत वाढत आहे.
ठाण्यात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असताना मुंबईत स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढला आहे. १७ जुलैपर्यंत स्वाईन फ्ल्यूचे मुंबईत ११ रुग्ण होते. मात्र ७ दिवसांत रुग्ण संख्येत ५१ ने वाढ झाल्याने धोका वाढला आहे. त्यासोबत स्वाईन फ्ल्यूच्या एकूण रुग्णांची संख्या ६२ वर पोहोचली आहे.
तर मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत ही झपाट्याने वाढ होतं आहे. मुंबई साथीच्या आजारांचा झपाट्याने प्रसार होत असून १ ते २४ जुलै दरम्यान मलेरियाचे ३९७, गॅस्ट्रोचे ५२४, स्वाईन फ्ल्यूचे ६२, कावीळीचे ५५ रुग्ण आढळले आहेत.
ठाण्यात दोन रुग्णांचा मृत्यू
ठाण्यात जुलै महिन्यात आढळून आलेल्या २० पैकी २ महिला रुग्णांचा मृत्यु झाला आहे. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने सतर्क होत योग्य उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोना बरोबरच स्वाईन फ्ल्यू ची देखील तपासणी
वाढत्या रुग्णसंख्येमुळे याच्या नियंत्रणासाठी सर्वेक्षण, प्रतिबंध व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना आणि स्वाईन फ्ल्यू या आजाराची लक्षणे एकच असल्याने रुग्णाची कोरोना बरोबरच स्वाईन फ्ल्यू ची देखील तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी दिली आहे.
गेल्या 15 दिवसांमध्ये राज्यातील ठाणे,पालघर,पुणे,कोल्हापूर, या ठिकाणी स्वाईन फ्ल्यू वाढत असून हा विषाणू त्याचं अस्थित्व दाखवू लागला आहे. त्यामुळे कोविड हा सौम्य होत चालला आहे.कोविड आणि स्वाईन फ्ल्यू या आजाराच्या प्रतिबंधातमक उपाय एकच असून नागरिकांनी देखील खबरदारी घेणे गरजेचं आहे असे प्रदिप आवटे यांनी म्हटले आहे.