मुंबई : सिंधुदुर्गवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सिंधुदुर्गात देखील ताजचे फाईव्ह स्टार हॉटेल उभारलं जाणार आहे. मौजे शिरोडा वेळागर येथील जमीन हस्तांतरण करण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि हॉटेल ताज यांच्यामध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्याकरिता संपादीत केलेली व शासकीय जमीन मिळून एकूण ५४.४० हेक्टर जमीन ९० वर्षासाठी भाडेपट्ट्याने देण्याकरीता भाडेकरार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा राज्यात अनेक पंचतारांकीत प्रकल्प, हॉटेल्स, रिसॉर्ट आहेत. कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोकणात प्रथमच पंचतारांकीत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्पात ताज ग्रुप 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. या प्रकल्पामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यात देशी व परदेशी पर्यटक आकर्षित होतील. तसेच यामुळे रोजगार निर्मिती व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेस चालना मिळेल.


ताडोबा परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभाग आणि थ्रायव्हींग हॉटेल्स प्रा. लि. यांच्यामध्येही यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'ताडोबातील वाघ, राज्यातील विविध समुद्रकिनारे, जंगल, गडकिल्ले हे राज्याचे भांडवल आहे. आपण जगासमोर हे चांगल्या पद्धतीने मांडले पाहीजे. पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढणे आवश्यक असून त्यासाठी राज्य शासनामार्फत प्रोत्साहन दिले जाईल. पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देणे ही अभिनव कल्पना आहे. लॉकडाऊनच्या काळात पर्यटन बंद असले तरी कोरोनाचे संकट संपल्यानंतर या व्यवसायाला निश्चितच चालना मिळेल. ताज हॉटेलने कोकणात पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक केल्याने कोकणातील वैभवाची जगाला ओळख होईल. राज्याच्या इतर भागातही अशा विविध प्रकल्पांना शासनामार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल.'



उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की, पर्यटन हे सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र आहे. त्यामुळे राज्यात पर्यटन विकासासाठी शासनामार्फत संपूर्ण सहकार्य केले जाईल. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आज झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून चांगली सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात यावा. तसेच या प्रकल्पासाठी ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार देण्यात यावा. राज्यातील कोस्टल रोडसाठी केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करु. तसेच पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देण्याचा विचार सुरु आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.'