मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत 'सामना'तून भाजपवर करत असलेल्या टीकेला तरूण भारतच्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला आहे. या अग्रलेखात संजय राऊत यांना बेताल आणि विदूषक असे संबोधत त्यांच्यावर जळजळीत शब्दांत टीका करण्यात आली आहे. 'उद्धव आणि बेताल', असे शीर्षक असणाऱ्या अग्रलेखात संजय राऊत यांच्या नावाचा थेट उल्लेख नाही. मात्र, बेताल या पात्राला उद्देशून वापरण्यात आलेले संदर्भ तंतोतंत संजय राऊत यांना लागू पडत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला माझा शेतकरी महत्त्वाचा आहे, हे वाक्य नेहमी उद्धव ठाकरेंच्या तोंडी असते. मात्र, आज दोन तृतीयांश शेतकरी नैसर्गिक आपत्तीने पीडित आहेत. अशावेळी उद्धव ठाकरे यांचे विचार कृतीत उतरताना दिसत नाहीत. उद्धव ठाकरेंची राजकीय समज, त्यांची परिपक्वता, समंजसपणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्याच्या विकासासाठी पोटतिडकीने काम करणार्‍या मुख्यमंत्र्यांशी असलेले त्यांचे घट्ट भावनिक ऋणानुबंध हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक असताना हा ‘बेताल’ शिवसेनेच्या छाताडावर बसल्याचे चित्र अनेकांसाठी वेदनादायी असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. 


बाळासाहेब ठाकरे यांनी आपली हयात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीतून महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी घालविली. हा ‘बेताल’ मात्र त्याच बाळासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याचा संघर्ष धुळीस मिळविण्याच्या मागे लागला आहे. रोज एक अग्रलेख लिहिणं, सकाळी ९ वाजता वाहिन्यांना मुलाखती देणे आणि दिवसभर मग विशेष मुलाखती देत फिरणं किंवा बातम्या पेरणं यात आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचा राज्यकारभार चालवून दाखविणं यातील अंतर समजून घेण्याची ज्यांच्यात क्षमता नाही, त्यांच्याकडून ती अपेक्षा तरी कशी करायची, अशी टीका राऊत यांच्यावर करण्यात आली आहे.