दिनेश दुखंडे झी मिडिया मुंबई : टॅक्सीडर्मीला मराठी भाषेत भुसा भरलेला मृत प्राणी किंवा पक्षी असं म्हणतात...पण या टॅक्सीडर्मीची बोरीवलीच्या नॅशनल पार्क एक अख्खी दुनिया आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोतील बिबट्याला पाहिलं की तो कधीही तुमच्यावर झेपावेल असंच वाटेल...पण काळजीचं कारण नाही...तो मृत आहे...आणि जे तुम्ही पाहात आहात ती त्याची टॅक्सीडर्मी आहे. 


बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या वन्यजीव जतन केंद्र म्हणजेच टॅक्सीडर्मी सेंटरमध्ये कृष्णा या बिबट्याची टॅक्सीडर्मी सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. 


जानेवारी महिन्याच्या अखेरीस कृष्णा या मादी बिबट्याचा वृद्धापकाळानं मृत्यू झाला...टॅक्सीडर्मी सेंटरचे प्रमुख डॉ. संतोष गायकवाड यांनी तिला पुन्हा जिवंत केलंय...कृष्णासोबत तिचा जोडीदार बिबट्या राजाचीही टॅक्सीडर्मी इथं पाहायला मिळते....राजाचा 2014 साली मृत्यू झाला होता...योगयोग म्हणजे जिवंत असताना आणि आता मृत्यूनंतरही हे दोघे पुन्हा एकत्र आहेत...


ऑक्टोबर 2009 मध्ये या टॅक्सीडर्मी सेंटरची सुरुवात झाली...देशातलं हे पहिलं आणि एकमेव टॅक्सीडर्मी सेंटर आहे...त्यामुळे देशाच्या विविध राज्यातील नॅशनल पार्क किंवा प्राणी संग्रहालयातून मृत प्राणी इथं आणले जातात आणि डॉ. गायकवाड यांच्या हातात असलेल्या किमयेनं ते पुनरुज्जीवत होऊन आपआपल्या राज्यात परत जातात...डॉ. गायकवाड हे मुंबईतील पशुवैद्यक महाविद्यालयात शरीरशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापकही आहेत...


डॉ. गायकवाड यांनी मुंबईतल्या नॅशनल पार्क आणि जिजामाता उद्यानातील 12 मोठ्या वन्य प्राण्यांची टॅक्सीडर्मी केली. त्यात वाघ, सिंह, बिबट्या, अस्वल ते अगदी हत्ती, गेंडा आणि पाणघोड्याचाही समावेश आहे. दुर्मिळ कासवं, अजगर, वानर ते विविध पक्ष्यांचा डॉ. गायकवाड यांच्या हातातील किमयेनं अक्षरशः पुनर्जन्मच झालाय असं म्हणावं लागेल...अनेकदा राष्ट्रीय वन्यप्राणी संपत्ती ते मृत झाल्यानंतर एकतर जाळली जाते किंवा जमिनीत पुरण्यात तरी येते. जाळल्यावर त्या संपत्तीची राख होते किंवा पुरल्यावर मातीतरी...त्यामुळे टॅक्सीडर्मी प्रक्रियेमुळं ज्या प्राण्यांचा पुनर्जन्म झालाय, त्यांना भाग्यवानच म्हणावे लागेल....