शिक्षक प्रशिक्षण : मराठी वाहिनीला डावलून ‘गुजरात’ वाहिनीची निवड, तावडेंचे समर्थन
शिक्षकांना येत्या २४ ते २६ सप्टेंबर रोजी व्हर्च्युअल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने दूरदर्शनच्या मराठी ‘सह्याद्री’ वाहिनीला डावलून ‘वंदे गुजरात’ या वाहिनीची निवड केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुंबई : राज्यातील शिक्षण विभाग पुन्हा एकदा वादात अडकण्याची चिन्हं आहेत. राज्यातील शिक्षकांना गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यापूर्वी आठवीच्या पुस्तकात गुजराती भाषेतील धडे छापून आले होते. सरकारच्या या गुजराती प्रेमाबद्दल आता टीका होऊ लागली आहे.
आठवीच्या पाठयपुस्तकात गुजराती भाषेतील मजकूर छापून आल्याप्रकरणी टीका झालेल्या राज्याच्या शिक्षण विभागावर पुन्हा एकदा गुजराती प्रेमाबद्दल टीका होऊ लागलीये. यावेळी राज्यातील शिक्षकांना गुजराती भाषेतील वंदे गुजरात या वाहिनीवरून व्हर्च्युअल प्रशिक्षण देण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे.
राज्यातील इयत्ता पहिली आणि आठवीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. शिक्षकांना या बदललेल्या अभ्यासक्रमाचे येत्या २४ ते २६ सप्टेंबर रोजी व्हर्च्युअल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने दूरदर्शनच्या मराठी ‘सह्याद्री’ वाहिनीला डावलून ‘वंदे गुजरात’ या वाहिनीची निवड केली आहे.
राज्यात ही वाहिनी दिसत नसल्यामुळे त्यासाठी शाळेत ‘डीश सेटटॉप’ बॉक्स बसवावा; अथवा ज्यांना हे शक्य नाही त्यांनी ‘जिओ टीव्ही’ अॅपमधील वंदे गुजरात वाहिनी बघावी, असे आदेशात म्हटले आहे. शिक्षण विभागाच्या या गुजराती प्रेमावरून विरोधकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लक्ष्य केले आहे.
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या निर्णयाचे समर्थन केलं आहे. वंदे गुजरात ही वाहिनी शिक्षकांच्या व्हर्च्युअल प्रशिक्षणासाठी मोफत सेवा उपलब्ध करून देत असल्याचा दावा शिक्षणमंत्र्यांनी केला आहे. आम्ही काही पाकिस्तानच्या चॅनलचा वापर केला नसल्याचं सांगत तावडेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देत या निर्णयाची जोरदार पाठराखण केलीये.
शिक्षण विभागाच्या या निर्णयाबद्दल शिक्षकांमध्येही आश्चर्य व्यक्त केलं जात असून आता वंदे गुजरात वाहिनी कुठे दिसते हे शोधण्याचे नवेच काम राज्यातील शिक्षकांना लागले आहे.