Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक ठाकरे लवकरच प्रवेश करणार आहे. त्यांचं नाव आहे तेजस उद्धव ठाकरे (Tejas Uddhav Thackeray). शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कनिष्ठ चिरंजीव आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंचे (Aditya Thackeray) धाकटे बंधू. शिवसेनेतला सत्तासंघर्ष गाजत असताना, आता शिवसेनेला नवी उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे आपला हुकूमाचा एक्का बाहेर काढणार आहेत आणि हा एक्का आहे तेजस ठाकरे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी उद्धव ठाकरे मर्सिडीजमधून राज भवनावर पोहोचले, त्यावेळी पुढच्या सीटवर त्यांच्यासोबत बसले होते तेजस ठाकरे. शिवसेनेतल्या सत्तासंघर्षाचे ते जवळचे साक्षीदार. राजकारणाचं बाळकडू त्यांना जन्मतःच लाभलं. ब्रँड ठाकरेचं वलय बालपणापासूनच त्यांच्याभोवती आहे. 


सध्या बंडामुळं शिवसेनेत उभी फूट पडलीय. शिवसेनेतली मातब्बर मंडळी पक्ष सोडून चाललीत. अशावेळी तेजस मैदानात उतरून शिवसेनेत आणि शिवसैनिकांमध्ये नवी उमेद निर्माण करू शकतात. तसं झाल्यास शिवसेनेसाठी ती दो से भले तीन ठाकरे अशी जमेची बाजू ठरणार आहे.


काही मोजक्या राजकीय घटना वगळल्या तर तेजस ठाकरे नेहमीच राजकारणापासून दूर राहिलेत. अलिकडेच त्यांनी कोल्हापूरचा दौरा केला. त्यानंतर कार्ला गडावर जाऊन ठाकरे घराण्याचं कुलदैवत असलेल्या एकवीरा देवीचं दर्शन घेतलं. शिवसेनेवर आलेलं राजकीय विघ्न लवकरच दूर होऊ दे, अशी प्रार्थना त्यांनी एकवीरा मातेला केली. 


त्यामुळं ते लवकरच सक्रीय राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झालीय. विशेष म्हणजे बाळासाहेबांनी 10 वर्षांपूर्वीच तेजसची भरसभेत ओळख करुन दिली होती.



तेजस ठाकरे करतात तरी काय?
आपल्या वडिलांप्रमाणंच तेजस ठाकरेंना फोटोग्राफीचा छंद आहे. पण ते वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत. दुर्मिळ प्राण्यांचं संशोधन आणि जतन हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. तेजस यांनी सापाच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावलाय, त्याला बोईगा ठाकरे असं नाव दिलं. त्याशिवाय लाल रंगाच्या दुर्मिळ खेकड्याचा शोधही त्यांनी लावला. त्यांचे अनेक प्रबंध पर्यावरण विषयक मासिकांमध्ये प्रकाशित झालेत


अलिकडेच तेजस ठाकरेंचा 26 वा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्तानं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये सचिव मिलिंद नार्वेकर यांनी खास जाहिरात प्रसिद्ध केली होती. 'ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस्' अशा शब्दांत तेजस ठाकरेंचा उल्लेख जाहिरातीत करण्यात आला होता. शिवसेनेच्या हातातून निसटत चाललेला राजकीय सामना वाचवण्यासाठी कॅप्टन उद्धव ठाकरेंनी आता या व्हिव्हियन रिचर्डच्या हाती बॅट दिली, तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.