मुंबई : शिवसेनेने सुरुवातीपासून सत्तेत अर्धा वाटा हवा, अशी आक्रमक सुरुवात केली. त्यानंतर भाजपनेही आता आक्रमक भूमिका घेत भाजपचाच पाच वर्षे  मुख्यमंत्री असेल सांगितले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव वाढला आहे. त्याचवेळी 'सामना' दैनिकातून भाजपविरोधात लिखाण करण्यात येत आहे, अशी भाजपने नाराजी व्यक्त करत काँग्रेस विरोधात लिहून दाखवा, असे प्रति आव्हान दिले आहे. या जोरदार उत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीविराेधात तेव्हा लिहले म्हणून २०१४ ला युतीची सत्ता आली, हे लक्षात ठेवा.  माझ्यावर फणा काढायची गरज नाही, पक्षाची भूमिका मी मांडत आहे, असे रोखठोक मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत, याची क्लिपही दाखवली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीच मान्य केले हाेते सत्तेत अर्धा वाटा देण्याचे. ( राऊत यांनी आपल्या माेबाईलमधील सीएमचा हॉटेल ब्लू सीमधील बाईट दाखवला.) त्यामुळे आता भाजप काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, पुढील पाच वर्षे आपणच मुख्यमंत्री राहणार असल्याचं मोठे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचे काहीही ठरलेले नसल्याचंही त्यांनी सांगिले. वर्षा बंगल्यावर पत्रकारांसोबत झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी ही माहिती दिली. सत्तास्थापनेबाबत औपचारिक आणि अनौपचारिक पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. उद्याच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला भाजप अध्यक्ष अमित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अमित शाह आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीची शक्यता मावळली आहे. 


दरम्यान, महायुतीच्या सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याचवेळी ताणातानीही सुरु आहे. शिवसेना-भाजपत वरिष्ठ पातळीवर आजपासून चर्चा करणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. तर भाजपा-सेनेत चर्चा होणारच नाही, असं कुणी सांगितले, असा संजय राऊतांनी सवालही उपस्थित केला आहे.


भाजप-शिवसेनेतला सत्ता स्थापनेचा संघर्ष कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचं दिसते आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रात कुण्या दुष्यंतांचे वडील जेलमध्ये नाहीत असा टोला राऊतांनी भाजपाला लगावलाय. भाजपा कुठपर्यंत ताणणार हेच आता बघायचंय असं आव्हान त्यांनी दिले आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपा आणि शिवसेना युतीला बहुमत देऊन सरकार स्थापनेची संधी दिली आहे. परंतु दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्यात अडकले आहेत. अजूनही सरकार स्थापन करण्याबाबत हालचाली होता दिसत नाही. शिवसेनेने ५०-५० चा फॉर्म्युला सांगत सत्तेत निम्मा वाटा मागितला आहे. त्यामुळे शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर अडकली आहे, तर भाजप त्यावर कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही. भाजप सेनेच्या आमदाराला फोडण्याबाबत बोलत असताना, शिवसेनाही इतर पर्यायांचा प्रयत्न करण्याचा दावा करत आहे.