ठाकरे गटाचं `मिशन लोकसभा`, उत्तर पश्चिम मुंबईत वडीलांविरुद्ध मुलगा टक्कर देणार?
ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वात आधी आपल्या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाने उमेदवारही जवळपास निश्चित केला आहे.
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : ठाकरे गटाकडून (Thackeray Group) आता थेट लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत बालेकिल्ला पुन्हा सर करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आतापासूनच तयारी सुरू केली आहे. काही जागांसाठी उद्धव ठाकरे यांनी काही नावांची निश्चिती केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
उत्तर-पश्चिम मुंबईत लोकसभा मतदारसंघ
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात (North West Mumbai constituency) सध्या गजानान किर्तीकर (MP Gajanan Kirtikar) हे खासदार आहेत आणि सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) आहेत खासदार कीर्तीकरांचा मुलगा अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) हे मात्र ठाकरे गटासोबत कायम आहे. आता अमोल किर्तीकरच लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार असणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावत गजानन कीर्तीकरांनी काम केलं. शिवसेना (Shivsena) वाढवण्यासाठी त्यांनी मुंबईसह महाराष्ट्र पिंजून काढला होता. पण एकनाथ शिंदेच्या बंडाच्या काळात गजानान किर्तीकर हे ठाकरेंना सोडून गेले पण किर्तीकरांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर मात्र ठाकरेंसोबत राहिले. अमोल किर्तीकर हे आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) विश्वासातले मानले जातात.
शिवसेनेचा बालेकिल्ला
या मतदारसंघात ठाकरेंचे सहापैकी सुनिल प्रभू, रविंद्र वायकर आणि ऋतुजा लटके असे तीन आमदार आहेत. तर जवळपास 10 नगरसेवक आहेत. 2014 च्या निवडणुकीत गजानन किर्तीकर यांनी गुरुदास कामत यांचा सुमारे 1 लाख 80 हजार मतांनी पराभव केला होता. तर 2019 साली मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी या मतदारसंघातून गजानन किर्तीकर यांना आव्हान दिलं होतं. पण किर्तीकरांनी संजय निरुपम यांचाही मोठ्या मताधिक्यांनी पराभव केला होता.
गजानन किर्तीकर शिंदे गटासोबत
गजानान किर्तीकर हे 1990 साली ते पहिल्यांदा मालाड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. 1990, 1995, 1999, 2004 अशा सलग चार वेळेस ते आमदार झाले. 1995 ते 1998 या काळात गजानन किर्तीकर गृहराज्यमंत्री व पर्यटन राज्यमंत्री होते. 1998 ते 99 या काळात ते नारायण राणे यांच्या कॅबिनेटमध्ये परिवहन मंत्री होते. ज्या वेळी गजानन किर्तीकर हे शिंदेंसोबत गेले.
त्याचवेळी त्यांचे पूत्र अमोल किर्तीकर तातडीनं पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले आणि आपण ठाकरेंसोबत असल्याचं त्यांनी जाहिर केलं होतं. आदित्य ठाकरेंच्या कोअर कमिटीमध्ये राहून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात अमोल किर्तीकरांनी मोलाचा वाटा उचलला आहे. सिनेट निवडणुकांमध्ये देखील महत्वाची कामगिरी बजावली होती आता हाच चेहरा ठाकरेंसाठी लोकसभेचा संभाव्य चेहरा असणार आहे.