ठाकरेंच्या `रिमोट कंट्रोल`ची पॉवर घटली? उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ का आली?
अवघ्या अडीच वर्षांतच असं काय घडलं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ का आली?
Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांची खुर्ची धोक्यात आली आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनी 40 हून अधिक शिवसेना आमदारांसह बंड पुकारून उद्धव ठाकरेंच्या खुर्चीखाली राजकीय बॉम्ब फोडलाय. शिवसेना आमदारांच्या बंडामुळं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनाम्याचे संकेतही दिलेत.
अवघ्या अडीच वर्षांतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ही वेळ का आली, याची चर्चा आता महाराष्ट्रात रंगतेय.
उद्धव ठाकरेंवर ही वेळ का आली?
1) उद्धव ठाकरेंचा तुटलेला जनसंपर्क
मुख्यमंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तीचा दांडगा जनसंपर्क असावा लागतो. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असून कुणालाच भेटत नाहीत, अशी सगळ्यांचीच तक्रार आहे. अगदी आमदार-खासदार आणि शिवसेनेच्या नेत्यांना देखील. मातोश्री आणि वर्षा एवढंच कार्यक्षेत्र मानणाऱ्या उद्धव ठाकरेंपर्यंत आमदारांमध्ये असलेली खदखद आणि नाराजीची भावना अजिबातच पोहोचली नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याच्या तक्रारी आमदारांनी केल्या. पण त्याकडं कायम दुर्लक्षच झालं.
2) ठाकरेंचं दरबारी राजकारण
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री अशी दोन्ही पदं सांभाळताना उद्धव ठाकरेंना तारेवरची कसरत करावी लागतेय. कोणताही निर्णय घेण्यासाठी काही निवडक विश्वासू व्यक्तींवरच ते अवलंबून असतात. आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई, संजय राऊत, विनायक राऊत अशा काही मोजक्या नेत्यांवरच त्यांची भिस्त आहे. त्यामुळंच उद्धव ठाकरे दरबारी राजकारणात अडकल्याची चर्चा आता होतेय.
3) आर्थिक हितसंबंधांचा गोतावळा
सरकार आणि पक्ष चालवताना नेतृत्वाला आर्थिक हितसंबंध सांभाळावे लागतात. अलिकडच्या काळात शिवसेनेच्या अनेक नेत्यांविरोधात ईडीच्या कारवाया सुरू झाल्यात. त्यामुळं शिवसेनेचं अर्थकारणच अडचणीत सापडलंय. एकनाथ शिंदेंसारखे मंत्री शिवसेनेला आर्थिक रसद पुरवत होते. मात्र त्यांनाच निर्णयप्रक्रियेत डावलण्यात येत असल्यानं असंतोष वाढत गेला.
4) जनमानसात प्रतिमा निर्मितीत अपयश
माध्यमांपासून कायम दोन हात लांब राहणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वतःची प्रतिमा निर्मिती करता आली नाही. शिवसेनेसारख्या बड्या पक्षाचा कारभार एकहाती सांभाळणारे उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरल्याची चर्चा सुरू झालीय. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतल्या मविआच्या पराभवामुळं त्यांच्या कारकीर्दीला अपयशाचं गालबोट लागलं. आणि आता शिवसेना आमदारांच्या बंडामुळं त्यावर शिक्कामोर्तब झालंय.
ठाकरे घराण्यातील व्यक्ती कधीही निवडणूक लढवणार नाही, हे तत्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर जोपासलं. शिवसेना पक्षावर त्यांचा हुकमी रिमोट कंट्रोल होता. मात्र मुख्यमंत्रीपद आणि सत्ता टिकवण्यासाठी राजकीय कसरती करता करता उद्धव ठाकरेंच्या रिमोटची बॅटरी कमी कमी होत गेली. आता ही बॅटरी ते पुन्हा कशी चार्ज करतात, ते पाहायचं.