विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांचा तिढा सुटणार ?
राज्यपाल आज सायंकाळपर्यंत या १२ नावांना मंजूरी देणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांचा तिढा सुटणार का? असा प्रश्न आता पुन्हा विचारला जाऊ लागलाय. १५ दिवसात नावांना मंजूरी देण्याची विनंती महाविकास आघाडी सरकारतर्फे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना केली होती. आज १५ दिवसांचा कालावधी संपतोय.
राज्यपाल आज सायंकाळपर्यंत या १२ नावांना मंजूरी देणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. आज मंजूरी दिली नाही तर पुढील महाविकास आघाडी सरकार पुढील भूमिका लवकरच ठरवणार असल्याचे सांगण्यात येतंय.
राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष पाहता राज्यपाल या नावांना मंजूरी देण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा सुरु आहे. राज्यपालांनी मंजूरी दिली नाही तर महाविकास आघाडी सरकार या प्रकरणी न्यायालयात जाण्याच्याही तयारीत आहे.
राज्यपाल आणि महाविकास आघाडीत संघर्ष सुरूच आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजही राज्यपाल नियुक्त आमदारांवरुन राज्यपालांना शालजोडीतले लगावले होते. राज्यपाल कोणाताही वाद निर्माण करणार नाहीत, अशी अपेक्षा असल्याचे राऊत यांनी म्हटले होते.